ऐन दिवाळीत अवकाळीने कांदा,मक्याचे नुकसान

पुढील चार ते पाच दिवस राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

onions

नाशिक:सप्टेंबर महिन्यात नाशिककरांना झोडपून काढलेल्या पावसाने आता ऐन दिवाळीत हजेरी लावली.त्यामुळे  दिवाळीच्या आनंदावर पाणी फेरले गेले.शुक्रवारी (दि.५) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीत धावपळ उडाली.

लक्षव्दीप, कर्नाटक, सागरी किनारपट्टीत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र वरच्या बाजूने सरकत अधिक दाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात अचानकपणे झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने दिवसभर हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. जोर‘धार’ बरसलेल्या पावसामुळे विविध भागांत पाणी साचले होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह उनगरांमध्येही पावसाने जोरदार सलामी दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्याती अंबोली, वेळुंजे, शिरसगाव, विनायक नगर, गणेशगाव, गोरठाण, वाघेरा, माळेगाव, ब्राम्हणवाडे, धुमोडी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे धान्य बाहेर काढताना शेतकर्‍यांची दमछाक पहायला मिळाली.

मका, कांदा रोपे संकटात

येवला तालुक्यात पावसामुळे मका, कांदा,रोपे संकटात सापडल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडाली. तालुक्यातील भाटगाव, धानोरे, नागडे, धामणगाव, गोल्हेवाडी, सायगाव परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकर्‍यांचे मका, चारा, कांदा रोपांचे नुकसान झाले. दिवाळीनिमित्त मजूरही आपापल्या गावी गेल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने कांदा रोपांची टंचाई भासत असल्याने पुन्हा पावसाच्या तडाख्यात कांदा रोपे सापडल्याने कांदा पिकेही संकटात सापडली आहेत.