घरमहाराष्ट्रनाशिकनृत्य साधनेतून नाशिकमध्ये रंगली दिवाळी पहाट

नृत्य साधनेतून नाशिकमध्ये रंगली दिवाळी पहाट

Subscribe

उत्सव नर्तनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सण विषयावर आधारित शास्त्रीय नृत्य केले सादर

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यंदा दिवाळीची पहिली पहाट शास्त्रीय नृत्याने रंगली. नाशिकच्या कलाकारांनी यंदा उत्सव नर्तनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सण या विषयावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर केले. अदिती पानसे यांनी राम स्तुती, दुर्गा वंदना सादर केली. तर, अभिजात अकादमीच्या विद्यार्थिनींनी मंगळागौरचे खेळ नृत्यातून सादर केले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

कोरोनाकाळात अनेक संकटांवर मात करत पुन्हा एकदा आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. १३ वर्षांपासून नाशिकमधील तीन महत्त्वाच्या कथक नृत्य संस्था किर्ती कला मंदिर, अभिजात नृत्य नाट्य कला अकादमी आणि कलानंद कथ्थक नृत्य संस्था एकत्र येऊन नाशिकरांना नृत्य साधनेतून कलामयी दिवाळी साजरी करण्याची संधी देत असतात. यंदा उत्सव नर्तनच्या माध्यमातून नवरचना विद्यालय, गंगापूर रोड येथे महाराष्ट्राचे सण या विषयावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. यामध्ये चैत्रापासून ते फाल्गुनपर्यंत येणार्‍या सणांवर नृत्य सादर करण्यात आले.

- Advertisement -

सुरुवातीस दिपनृत्य आणि गणेश स्तुती सादर झाली. किर्ती कला मंदिरच्या संचालिका अदिती पानसे यांनी पंडित शौनक अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली राम स्तुती सादर केली. त्यानंतर दुर्गा वंदना (कलानंद नृत्य संस्था) सादर केली. अभिजात अकादमीच्या विद्यार्थिनींनी मंगळागौरचे खेळ नृत्यातून सादर केले. उत्सव नर्तन या कार्यक्रमात महाशिवरात्री सण तुलसीदास रचित व अदिती पानसे यांनी नृत्यबद्ध केलेले रुद्राष्टकम किर्ती कला मंदिरच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी सादर केले.

श्री राम भजन (कलानंद नृत्य संस्था) आणि गुरू वंदना (अभिजात अकादमी) या प्रस्तुती केल्या गेल्या. या आनंदोत्सव श्रीकृष्णाचे नमन केल्याशिवाय अपुरा ठरला असतात. त्यामुळे कृष्णाष्टक हे किर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी सादर केले. त्यानंतर अभिजात अकादमीच्या विद्यार्थिनींनी होरी प्रस्तुत केली. या नृत्य उत्सवाची सांगता तिन्ही नृत्य संस्थांचे गुरू आणि त्यांच्या विद्यार्थिनींच्या भैरवी या नृत्य प्रस्तुतीने झाली. रसिकांनी दिवाळीनिमित्त मिळालेल्या नृत्य भेटीला दाद दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -