Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र डंका नाशिक ढोलचा : मराठी संस्कृती जतन करणारे 'शिवसाम्राज्य ढोलपथक'

डंका नाशिक ढोलचा : मराठी संस्कृती जतन करणारे ‘शिवसाम्राज्य ढोलपथक’

Subscribe

गणेशोत्सव आणि ढोल-ताशा यांचे समीकरण जगभरात प्रसिद्ध आहे. याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांगल्याचे प्रतिक असणार्‍या या ढोल-ताशाचा बाज आजही ढोलपथकांनी टिकवून ठेवला आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळतानाच ढोलपथकातील सहभाग तरुणाईने कायम ठेवला आहे. नाशिकमधील अशा काही ढोलपथकांची माहिती खास वाचकांसाठी आजपासून माय महानगरमध्ये प्रसिद्ध करत आहोत.

नाशिक : मराठी संस्कृती टिकण्यासाठी प्रत्येक घरात ढोलवादक असावा. ढोलवादनाची परंपरा सातासमुद्रापार गेले पाहिजे. ढोल हे रणवाद्य असल्याने शिवजयंतीसह प्रत्येक सण व उत्सवात ढोलवादन झाले पाहिजे. केवळ वादन म्हणून नव्हे तर मनःशांतीसाठीदेखील ढोलवादन उपयुक्त ठरत असल्याची महत्वपूर्ण माहिती शिवसाम्राज्य ढोलपथकाचे पथकप्रमुख कुणाल भोसले यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. (Shivsamrajya Dhol pathak, Nashik)

पथकप्रमुख भोसले पुढे म्हणाले की, वादनाची आवड असल्याने मी सर्वप्रथम एका पथकामध्ये वादन शिकलो. त्यावेळी आपलेही ढोलपथक असावे, असा निश्चय केला. पथकप्रमुख महेंद्र नागपुरे व सागर चौधरी यांची सोबत लाभली. तिघांनी महाराष्ट्र दिनी १ मे २०१६ रोजी शिवसाम्राज्य ढोलपथक तयार केले. सुरुवातीला त्यात १८ वादक होते. आता ढोलपथकात २२५ वादक आहेत. पथकात ९ वर्षांपासून ते वयोवृद्धापर्यंत वादक आहेत. यात १०० महिला व १२५ पुरुष आहेत. पथकात महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वादकांचे पालक विश्वासाने त्यांना सरावासाठी पाठवतात. वादकांमध्ये अनेकजण डॉक्टर, इंजिनीअर, व्यावसायिक व त्यांचे पाल्य, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांची मुलेमुली आहेत. ढोलपथकाचे सभासद होण्यासाठी वादकाकडून एकदाच ५०० रुपये घेतले जातात.

- Advertisement -

शिवसाम्राज्य ढोलपथकाने सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून कोरोनाकाळात ५ हजारांहून अधिक लोकांना अन्नदान केले आहे. शिवाय, जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केले आहे. पथकाने सहा रक्तदान शिबिरे आयोजित केली. पथकाच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत नाशिकभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांसह नाशिककर सहकुटुंब आवर्जुन शिवसाम्राज्य ढोलपथकाचे वादन पाहण्यासाठी थांबतात.

ढोलपथकाने मुंबईतील लालबागजवळील चिंतामणी गणपतीसमोर व चिंचपोकळी येथील ताडदेवचा राजा येथे वादन केले आहे. शिवाय, शिवसाम्राज्य ढोलपथक विमानाने बेंगळुरुला गेले आहे. ढोलवादनाच्या दिवशी प्रत्येक वादकाचा विमा कंपन्यांकडून एक दिवसीय विमा काढला जातो. प्रत्येकाला आयकार्ड दिले जाते. वादनाच्या सरावासाठी पोलीस परवानगी घेतली जाते.

शिवसाम्राज्य ढोलपथकाकडील वाद्य

  • ८० ढोल
  • २५ ताशा
  • २१ झांज
  • १०१ ध्वज
  • २ टोल

नाशिक ढोल अन् पारंपरिक ढोलमध्ये असा आहे फरक

- Advertisement -

पारंपरिक ढोलला शिवकालीन परंपरा आहे. एकही वादक पैसे घेवून वादन करत नाही. त्या तुलनेत नाशिक ढोलमधील वादकांना पैसे दिले जातात. नाशिक ढोलसमोर कसेही नाचले जाते. मात्र, पारंपरिक ढोलसमोर शिस्त असते. पारंपरिक ढोलमध्ये नियोजन, स्त्री-पुरुषांमध्ये अंतर असते. पारंपरिक ढोलमध्ये गुलाल उधळला जात नाही की पैसे उधळले जात नाहीत. ढोलवादनाचे गर्जर, कल्लोळ व १ ते ७ आवर्तन असे प्रकार आहेत. गर्जरमध्ये आवाज खणखणीत असावा लागतो. त्यामुळे वादक सतर्क राहतो. कल्लोळमध्ये किलकिलाट असतो. आवर्तनमध्ये थोड्या थोड्या अंतराने ठेका बदलला जातो. वादकांनी ढोलवादनातून करिअरसुद्धा करता येते. या वादकांना कंपनी, हॉटेल, दुकानांचे उद्घाटन आणि लोकप्रतिनिधींच्या स्वागतावेळी वादन करता येते व त्यातून उत्पन्न मिळते.

ढोलचे प्रकार

चामडे व फायबर असे ढोलचे दोन प्रकार आहेत. चामड्याच्या ढोलची देखभाल-दुरुस्ती खर्चिक असते. त्या तुलनेत फायबर ढोलची दुरुस्ती नसते. चामड्याच्या ढोलचे ऊन्हापासून संरक्षण करावे लागते. तेल लावावे लागते. ढोलच्या डाव्या बाजूस थापी व उजव्या बाजूस ठेका असतो. प्रत्येक वादकाला पान बदलता आले पाहिजे, यासाठी सराव करून घेतला जातो, असे पथकप्रमुख भोसले यांनी सांगितले.

असा आहे ढोल, ताशा, भगव्या ध्वजाचा इतिहास

वादनासाठी ढोल, ताशाच का असला पाहिजे, यावर अनेक अख्यायिका आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूच्या मनात धडकी भरण्यासाठी आणि मावळ्यांमध्ये लढाईपूर्वी उत्साह निर्माण व्हावा, यासाठी रणवाद्य वादन करायचे. त्यामुळे शिवकालीन इतिहासात रणवाद्यास महत्व आहे. कोणत्याही मंगलप्रसंगी सर्वप्रथम मंगलवादन करत गणपतीला नमन केले जाते. शंकर महादेवाने तांडव नृत्य केले. ब्रह्मदेवाने मृदंग वाद्य निर्माण केले. त्याचे पहिले वादन गणपतीसमोर झाले. पहिला नर्तन देवता शंकर महादेव आहे. त्यातून ढोल व ताशाची निर्मिती झाली. तर, भगवा ध्वज अग्निदेवतेचे प्रतीक आहे. सूर्योदय होतो, त्यावेळी भगवा रंग दिसतो. तो रंग ब्रह्मदेवाने निर्माण केला. त्यामुळे वादन करताना भगवा ध्वजसुध्दा वापर केला जातो, असे पथकप्रमुख भोसले म्हणाले.

ढोलवादनास अशी होते सुरुवात

ढोलवादनापूर्वी सर्वप्रथम ध्वज नमन केले जातो. त्यानंतर वादन सुरु केले जाते. वादनावेळी घोषणासुद्धा दिल्या जातात. त्यास शिवस्तुती म्हटले जाते. वादनासाठी पारंपरिक पोशाख म्हणजे सलवार, कुर्ता, पायजमा, फेटा, जॅकेट, खाकी टोपी असते. शिवसाम्राज्य ढोलपथकात भगवा कुर्ता, जॅकेट, खाकी टोपी असा पेहराव आहे.

पहिल्यांदाच ढोलवादन करण्यापूर्वी असा केला जातो सराव

सर्वसामान्य माणूस सहजपणे ढोलवादन करू शकत नाही. ढोलची दोरी कमरेला बांधणे, लयबध्द व तालबद्ध वादन करण्यासाठी किमान दीड महिने सराव करावा लागतो. वादकांकडून दररोज दीड तास सराव करून घेतला जातो. वयोगटनिहाय ढोलचा पिंप लहान-मोठा असतो. एका ढोलचे वजन सरासरी ९ किलो असते. ढोलला १८ कड्या असतात. ढोलवादनाने शारीरिक व्याधी होत नाहीत. उलट शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो.

एका सुपारीला २५ हजार रुपये

गणेशोत्सवासह मोठ्या विशेष कार्यक्रमांवेळी ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते. एका सुपारीला सरासरी २५ हजार रुपये घेतले जातात. बाहेरगावी जायचे असेल तर आयोजक वादकांचा प्रवास खर्च करतात. या पैशांमधूनच ढोल-ताशांची देखभाल व दुरुस्तीचा खर्च होतो. शिवाय, सरावासाठी घेतलेल्या जागेचे भाडे दिले जाते. शिवाय, वादकांच्या वैद्यकीय खर्चासह सामाजिक बांधिलकीतून अन्नदान केले जाते, असे कुणाल भोसले यांनी सांगितले.

अशा आहेत वाद्याच्या किंमती

  • ढोल : ४ हजार ५०० रुपये
  • ताशा : ६ ते ७ हजार रुपये
  • ध्वज : ५०० ते ७०० रुपये
  • टोल : १० ते १५ हजार रुपये
- Advertisment -