माजी आमदार शिरीषकुमार कोतवालांच्या घरी धाडसी चोरी

भरदिवसा साडेदहा लाखांच्या ऐवजासह महत्त्वाची कागदपत्रे लंपास

माजी आमदार शिरीशकुमार कोतवाल यांच्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी भरदिवसा साडेदहा लाखांचा मुद्देमाल अन् काही महत्त्वाची कागदपत्रे, सह्या केलेले स्टॅम्प पेपरदेखील लंपास केले आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोतवाल कुटुंबीय आपल्या शहरातील घराला कुलूप लावून त्यांच्या चांदवड शिवारातील कोतवाल वस्तीवर राहण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि.4) सकाळी ९ वाजता ते शनिवारी (दि.5) दुपारी ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी चांदवड शहरातील या घरात कोणीही नसल्याची संधी साधली. घराचे कुलूप तोडून प्रवेश करत चोरट्यांनी लोखंडी कपाटातील १० हजार रुपये, 6 लाख रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र, 15 तोळ्याची सोन्याची पोत, 3 लाख 20 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 16 हजार रुपये किंमतीचे वेल अंगठी, चांदीचे तीन पैंजण, ६ हजार रुपये चांदीचे पायल पाच जोड, जमीन साठेखत, मूळ कागदपत्र, सही केलेले कोरे स्टॅम्प पेपर, आयकर विभागाची कागदपत्रे असा एकूण १० लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी घटनास्थळी भेटी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.