कोटमगावातील झुडुपांमध्ये आढळला मृत बिबट्या

नाशिक तालुक्यातील कोटमगावातील झुडुपांमध्ये शुक्रवारी (दि.२५) सकाळी मृत अवस्थेतील नर बिबट्या आढळून आला. या बिबट्याचा वयोमानामुळे मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (दि.२५) सकाळी कोटमगाव (ता. नाशिक) येथील एकलहरे विद्युत केंद्राच्या पंपिंग स्टेशनजवळ राखेच्या बंधार्‍याजवळील राखीव क्षेत्रात दाट झुडुपांमध्ये बिबट्या मृत अवस्थेत असल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्यानुसार वनअधिकारी व वनकर्मचारी तात्काळ घटनास्थळी गेले. त्यावेळी बिबट्या पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृत दिसून आला. पाहणीत बिबट्याचे अवयव सुस्थितीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वनकर्मचार्‍यांनी बिबट्यास ताब्यात घेत नाशिकमध्ये आणले. पशुवैद्यकीय अधिकारी, नाशिक यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकार्‍या म्हणण्यानुसार बिबट्या वयस्कर झाल्याने मृत झाला आहे. शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.