डम्पर-कार अपघातात नाशिकचे डॉ. ज्ञानेश्वर महाजन ठार

मुंबई-आग्रा महामार्गावरील रायगड नगर परिसरातील दुर्दैवी घटना

नाशिक:मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाताना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने डम्परला धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेदरम्यान रायगडनगर, वाडीवर्‍हे येथे घडली. या भीषण अपघातात कारच्या पुढील भाग चक्काचूर झाला असून, कारचालक डॉक्टरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिक येथील डॉ. ज्ञानेश्वर बळीराम महाजन (वय ५५) यांचा या अपघातात मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांचे घोटी येथे यांचे हॉस्पिटल असून ते नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान कार (एमएच-१९, एएफ-६६०५) ने नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावरुन घोटीकडे जात असताना, ते रायगडनगर परिसरात आले असता ओव्हरटेकच्या नादात वाळूचा डम्पर (एमएच-०६, के-३१५०) ला कारने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. १०८ रुग्णवाहिकेमार्फत त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची  तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवर्‍हे पोलीस करत आहेत.