घरमहाराष्ट्रनाशिकनासाकाकडे तब्बल ८४ कोटी ७२ लाखांचे कर्ज थकीत

नासाकाकडे तब्बल ८४ कोटी ७२ लाखांचे कर्ज थकीत

Subscribe

झारीतील शुक्राचार्य : नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे (पळसे) बँकेचे तब्बल ८४ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या सुगीच्या काळात सर्वाधिक कर्जपुरवठा केलेल्या कारखान्यांमध्ये नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (पळसे) दुसरा क्रमांक लागतो. या कारखान्याकडे बँकेचे तब्बल ८४ कोटी ८२ लाख रुपये कर्ज थकीत आहे. ‘नासाका’ हे बँकेसाठी सर्वात मोठे डोकेदुखी ठरली असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येते.

जिल्हा बँकेने वसुलीसाठी थोडे कठोर पाऊल उचलत कारखान्याची जागा विक्रीसाठी तीन वेळा जाहीरात प्रसिद्ध केली. मात्र, स्थानिक नागरिकांचा जागा विकण्यास तीव्र विरोध असल्यामुळे कोणीही ही सोन्यासारखी जागा खरेदी करण्याचे धाडस दाखवले नाही. ‘नासाका’कडे दोनशे एकर गायरान जमीन असून शासकीय नियमानुसार ही जमीन विकता येत नाही. या शासकीय नियमांचा आधार घेऊन स्थानिकांनी बँकेच्या विक्री प्रक्रियेवर आक्षेप घेतला. इतकेच नव्हे तर या प्रक्रियेत सहभागी होणार्‍यांना गावात ‘नो एन्ट्री’ केली आहे. २०१३-१४ मध्ये नाशिक साखर कारखान्याची चाके थांबली. त्यामुळे पाच वर्षांपासून बंद असलेला कारखान्याची जमीन धुळखात पडून आहे. जमिनीचा थेट लिलाव न करता निफाड साखर कारखान्याप्रमाणे तो भाडेतत्त्वावर चालवण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले जाते. प्रत्येक गोष्ट शासकीय नियमांमध्ये बसवणे शक्य नसल्यामुळे बँकेला आपल्या नियमांमध्ये थोडी शिथीलता आणावी लागेल, त्याशिवाय कारखान्याची चाके पुन्हा फिरणे अवघड आहे. गायरान जमीन विकण्यास शासकीय अडसर असल्यामुळे येथे नव्याने प्रकल्प उभारून भाडेतत्त्वावर चालवणे हा पर्याय सध्या उपलब्ध आहे. येथे को-जनरेशन प्लॅन्ट, मळी प्रकल्प आणि साखर कारखाना चालवणे सयुक्तीत ठरेल. या संयुक्त प्रकल्पांच्या आधारे बँकेला आर्थिक दिलासा मिळू शकतो.कारखान्याची चाके फिरली तरच बँकेला कर्जवसुलीचा आग्रह धरता येईल, त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये अडकल्या आहेत.

- Advertisement -

कारखान्याची सद्यस्थिती

सरफेसी कायदा २००२ अन्वये तीन वेळा विक्री व तीन वेळा भाडेतत्त्वाची जाहिरात देऊन त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कारखान्याच्या तत्कालिन सर्व संचालकांना बँकेस दिलेल्या हमीपत्रानुसार वैयक्तिकरित्या थकबाकी वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या खासगी मालमत्तेवर बँकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बँकेचे संचालक : माजी खासदार देविदास पिंगळे, जगन्नाथ आगळे, विष्णू कांडेकर, अशोक डावरे, निवृत्ती जाधव, मुरलीधर पाटील, मधुकर जगळे, माजीमंत्री तुकाराम दिघोळे, संतू पाटील, डॉ. सुनील ढिकले, केरू धात्रक, विश्वास नागरे, अ‍ॅड. जे. टी. शिंदे, राजू वैरागर, चंद्रभान जाधव, बाळासाहेब बरकले, यशवंतराव पिंगळे, अनिता करंजकर, लता जाधव.

बोलके आकडे…

  • ८४.८२ : कोटी मूळ कर्ज
  • २०१३-१४ : पासून ’नासाका’ची चाके थांबली
  • ३ : वेळा कारखाना विक्रीसाठी जाहिरात
  • ३ : वेळा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी नोटीस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -