महिला व बालकल्याण विभागाने समयसुचकता दाखवत रोखले चार बालविवाह

निफाड आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात रोखले बालविवाह

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ यांची एकत्रित बैठक घेत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा असे निर्देश दिले. या आदेशाच्या काही तासातच त्र्यंबकेश्वर तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी समयसुचकता दाखवत दोन बालविवाह होण्यापासून रोखले आहेत. तसेच गेल्या महिन्याभरात दोन बालविवाह थांबवत महिला व बालकल्याण विभागाने आपले कार्य सिध्द केले आहे.

त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे व निफाड तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कशा पध्दतीने बालविवाह रोखले याबाबत बैठकीत प्रसंगदेखील सांगितले. यानंतर अवघ्या काही तासात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांना गुरूवारी रात्री ११ वाजता वावीहर्ष गावात १७ वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याचे समजते. त्यावर गेजगे यांनी तात्काळ वावीहर्षचे ग्रामसेवक किसन राठोड, अंगणवाडी सेविका सांगिता किर्वे यासह पोलिस प्रशासनाला सोबत घेत गावातील बालविवाह होणाजया कुटुंबात जाऊन संबधित मुलगी व त्यांचे पालक यांची समजूत काढली.

त्यानंतर , हा बालविवाह रोखण्यात त्यांना यश आले. तसेच शुक्रवारी (दि.२०) सकाळी टाकेहर्ष गावातही असाच बालविवाह होत असल्याचे कळाल्यानंतर या गावातील ग्रामसेवक विजय आहिरे यांनी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन केले आणि विवाह थांबवला. हे बालविवाह रोखल्याने बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस प्रशासन यांचे जिल्हा बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी कौतुक केले आहे.

 

म्हणून थांबले बालविवाह

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावमध्ये 14.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलगी व 20.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले. यावेळी प्रशासनाने तात्काळ देवगाव येथे विवाह स्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवल्याची माहिती त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी दिली. निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली. मुलीसह आई वडिलांचे समुपदेशन करत हा विवाह बेकायदेशीर आहे, असे सांगत समुपदेशन केले आणि हा विवाह थांबवण्यात आला, अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी बैठकीत दिली.