घरमहाराष्ट्रनाशिकश्रीसंत निवृत्तीनाथ पालखीचे टाळमृदंगाच्या गजरात प्रस्थान

श्रीसंत निवृत्तीनाथ पालखीचे टाळमृदंगाच्या गजरात प्रस्थान

Subscribe

भाविकांनी गर्दी करु नये यासाठी सकाळपासूनच मंदिरा बाहेर मोठा बंदोबस्त

टाळमृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूर वारीसाठी जाणार्‍या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा प्रातिनिधीक प्रस्थान सोहळा गुरुवार (दि. २४) रोजी त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजे १९ जुलै रोजी शिवशाही बसमधून नाथांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
प्रतीवर्षी निवृत्तीनाथांची पालखी वट पौर्णिमेस म्हणजे ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस पंढरपूरकडे हजारो वारकरी भाविकांसमवेत प्रस्थान करते. मजल दरमजल करीत महिन्याभरात ही पालखी पंढरपूरला पोहोचते. असा हा भक्तीपुर्ण सोहळा साजरा होत असतो. परंतु याही वेळी करोनाच्या महामारीने सगळ्यांवरच बंधने आली आहेत. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी शासनाने पायी पालखी वारीस बंदी घातली असल्या कारणे आज पालखी प्रस्थान सोहळा मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. नाथांच्या पादुका आता १८ जुलै पर्यंत मंदिराच्या सभामंडपात पालखीत विराजमान राहतील, पालखी परंपरेनुसार नित्य पूजापाठ होतील. १९ जुलै रोजी पहाटे सहावाजता पालखी वाजतगाजत कुशावर्त तिर्थावर आणून तेथे नगराध्यक्षांच्या हस्ते पादुकांचा स्नानविधी होईल. त्यानंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आणून मंदिराचे बाहेर परंपरेनुसार अभंग गायन होईल. येथून शासन निर्देशानुसार दोन शिवशाही बसमधून वारकर्‍यांसह नाथांच्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

भाविकांनी गर्दी करु नये यासाठी सकाळपासूनच मंदिरा बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. बॅरिकेडींग लावून मंदिरात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला होता. यादीप्रमाणे निमंत्रितांची नावे बघूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. सकाळी समाधीची नित्य पूजा झाल्यावर पालखीचे मानकरी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, इतर मानाच्या दिंड्यांचे प्रतिनिधी आदिंना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला. ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी यांनी अभंग गायन केले. प्रस्थानाच्या अभंगासह धन्य धन्य निवृत्तीदेवा हा अभंग म्हणण्यात आला. श्रींच्या चांदिच्या पादुका व प्रतिमा समाधी जवळ ठेवून आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष केल्यावर नाथांची प्रतिमा व पादुका सजविलेल्या पालखीत ठेवून भजन कीर्तन करीत पालखीची मंदिर आवातच प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पालखी खरोखरी पंढरीस पायी निघाल्याचे भक्तीमय वातावरण होते. या सोहळ्यास संस्थान प्रशासकीय समितीचे सदस्य तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, पो. नि. संदिप रणदिवे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी विश्वस्त पवन भुतडा, पुंडलिक थेटे, ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, पंडित महाराज कोल्हे, ललिता शिंदे, संजिवन समाधीचे वंशपरंपरागत पुजारी ह.भ.प. अनिल महाराज गोसावी, ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी, ह.भ.प. अविनाश महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी, अद्वैत गोसावी, मानकरी व वारकरी उपस्थित होते. पो.नि. संदिप रणदिवे, स.पो.नि. अश्विनी टिळे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -