Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना ब्रेक

निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना ब्रेक

महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच नगररचना विभागाच्या उत्पन्नाला कोरोनामुळे जोरदार फटका

Related Story

- Advertisement -

 महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच नगररचना विभागाच्या उत्पन्नाला कोरोनामुळे जोरदार फटका बसला आहे. जीएसटी अनुदान उशिराने मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खर्चावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली असून, जून व जुलै महिन्यात साधारण किती खर्च होऊ शकेल, याची माहिती लेखा विभागाने सर्व विभागांकडून मागविली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात दीड वर्षांपासून घट होत आहे. विशेषत: या काळात घरपट्टी, पाणीपट्टीपाठोपाठ नगररचना विभागाच्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. बांधकाम परवानग्यांसाठी अद्याप ऑनलाइन बांधकाम प्रणाली कार्यान्वित न झाल्यामुळे मे महिन्यात नगररचना विभागाच्या उत्पन्नातही घट आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये वसुलीला गती येत असतानाच करोनाने धडक दिली. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीचे उत्पन्न घटले. गेल्या वर्षी तिजोरीला जवळपास तीनशे कोटींचा फटका बसला होता. सध्या करोनाच्या दुसर्‍या लाटेनेही उत्पन्नाला फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल व मे या दोन महिन्यांत महापालिकेला घरपट्टी वसुलीतून जेमतेम १८ कोटी ३८ लाख २६ हजार १४४ रुपये मिळू शकले. घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली थकबाकीसह चारशे कोटींवर पोहोचली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीपाठोपाठ नगररचनाचे उत्पन्न मोठे असते. परंतु, त्याच्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. युनिफाइड डीसीपीआरमुळे पहिल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे ६० ते ७० कोटी उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, ऑनलाइन बांधकाम परवानग्यांसाठीचे सॉफ्टवेअर अद्ययावत झालेले नाही. नवीन सॉफ्टवेअर लवकर कार्यान्वित न झाल्यामुळे परवानग्यांची गती मंदावली. त्यातच करोनामुळे बांधकामांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मंजुरीसाठी येणार्‍या प्रकरणांची संख्या मंदावली आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीपाठोपाठ नगररचना विभागाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे. करोनाचा फटका जीएसटी अनुदानालाही बसला आहे. केंद्र सरकारचे जीएसटी अनुदान दर महिन्याला सात ते आठ तारखेच्या आत मिळते. जून महिन्यात मात्र त्याला विलंब झाला असून, १५ जूननंतर ते मिळाले आहे. त्यामुळे नियोजनालाही फटका बसत आहे. परिणामी आता विकास कामांना थांबा देण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे विकास कामांना लवकरच ब्रेक लागणार असून पावसाळ्यातील कामे अपूर्ण राहण्याची शक्यत आहे.

- Advertisement -