श्री कालिका देवी दर्शन आता मोफत: पेड दर्शनाचा निर्णय अखेर रद्द

हिंदुत्ववादी संघटनांनी १०० रुपये घेऊन दर्शनाच्या निर्णयाला केला होता विरोध

Kalika devi Nashik

नाशिक – हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कालिका देवी मंदिर संस्थानने पेड दर्शनाचा निर्णय अखेर रद्द केला. त्यामुळे शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकचं ग्रामदैवत श्री कालिका देवीचे दर्शन आता मोफत घेता येणार आहे. नवरात्रोत्सवापर्यंत संस्थानतर्फे भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन टोकन दिले जाणार आहे. तसेच, प्रत्यक्ष दर्शन घेणार्‍या भाविकाने दोनवेळी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालिका देवी यात्रोत्सव यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोना नियमावलीनुसार मंदिर परिसरात थर्मल स्क्रिनिंग असेल. भाविकांनी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी श्री कालिका देवी मंदिर संस्थान, पोलीस, महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक कालिका मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यात कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांकडून शंभर रूपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, ऑनलाईन दर्शनाची सुविधा मात्र कायम राहणार आहे.

एक तासात ६० जणांना दर्शन

कालिका मातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन टोकन प्रणालीद्वारे १ तासात ६० भाविकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. टोकनधारक व्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये किमान ५ फुटाचे अंतर असणार आहे. १० वर्षाच्या आतील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश नाही. भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले.