घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक पूर्वच्या उमेदवारीची माळ अ‍ॅड. ढिकलेंच्या गळ्यात?

नाशिक पूर्वच्या उमेदवारीची माळ अ‍ॅड. ढिकलेंच्या गळ्यात?

Subscribe

पूर्व नाशिक मतदारसंघात उमेदवारीवरुन धुमश्चक्री सुरु असून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

पूर्व नाशिक मतदारसंघात उमेदवारीवरुन धुमश्चक्री सुरु असून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या जागेसाठी मनसेचे अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी बाजी मारल्याचे वृत्त असून गुरुवारी (ता. ३) सकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही सानप यांच्यासह स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनीही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

शहरातील मध्य आणि पश्चिम नाशिक मतदारसंघात भाजपने अनुक्रमे आ. प्रा. देवयानी फरांदे व आ. सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन आमदारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहरातील तिसरे आमदार बाळासाहेब सानप यांच्या बाबतीतील निर्णय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला. त्यामुळे सानप समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. त्यातच मंगळवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय उध्दव निमसे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे सानप समर्थक अधिकच संतप्त झाले. बुधवारी सकाळी स्वत: सानप पालकमंत्र्यांना जाऊन भेटले. मात्र त्यांना स्पष्टपणे उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन यावेळी ‘नको काळाराम, नको गोराराम आम्हाला हवा भोळाराम’ असे फलक झळविण्यात आले. एकीकडे भाजपच्या एका गोटात नाराजीनाट्य सुरु असताना दुसरीकडे मनसेचे अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी भाजपच्या श्रेष्ठींकडे जोरदार मोर्चेबांधणी केली. अ‍ॅड. ढिकलेंचा भाजपत काही वेळातच प्रवेश होणार अशा पोस्टही सोशल मीडियावर दिवसभर झळकत होत्या. रात्री उशिरापर्यंत मात्र या जागेबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -