अनेक संस्थांमध्ये पिंगळेंकडून अपहार:दिनकर पाटील

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे संचालक दिनकर पाटील यांचे आरोप

Devidas Pingle_Dinkar Patil

नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे संचालक देवीदास पिंगळे आपल्यावर खोटे आरोप करत असून अनेक संस्थांमध्ये पिंगळेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे संचालक दिनकर पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी पिंगळेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मोठ्या अपेक्षेने शेतकरी पिंगळेंना निवडून देतात. परंतु. नाशिक साखर कारखाना, जिल्हा बँक, नाशिक बाजार समिती या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मला गोदावरी कृषकच्या २०१७ पासून २०२० पर्यंत संचालक पदावरून कधीही काढले नाही, उलट मी याच काळात अध्यक्ष होतो याची माहिती संस्थेत उपलब्ध आहे.

मी ज्यावेळी अध्यक्ष होतो तेव्हा पिंगळे बाजार समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी कारागृहात होते.
तीन बैठकांना गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना संचालक पदावरून काढून टाकण्यात आले होते. पिंगळे व त्यांचे १२ साथीदारांनी आपल्यावर खोटे आरोप केले होते. त्याप्रकरणी पिंगळेंसह १२ संचालकांवर ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

पिंगळेंनी आपल्याला शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावरही अदखलपात्र गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तसेच माझ्यासह, माझ्याबरोबरचे संचालक बाळासाहेब थेटे, बाळासाहेब वायचळे यांनीही जिल्हा परिषद उपनिबंधकांना पिंगळेेंचे संचालकपद रद्द करण्याबाबतचे पत्र दिले होते. नासाका व जिल्हा बँकेतील भ्रष्टाचारामुळेच तेथे प्रशासक आले. त्यामुळे पिंगळे १० वर्षे कोणत्याही सहकार संस्थेवर संचालक नव्हते, यावर ते काहीच बोलत नाही.

पिंगळेंना यांच्यावर मुख्य लेखा परीक्षकांनी २०१३-२०१४ च्या अहवालानुसार ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवलेला आहे तो अहवालही शासनाचा आहे. त्याचा तपास ईडीकडे द्या व त्यांच्याकडून क्लीन चिट मिळवा, मग तुम्ही भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध होईल, असेही पाटील म्हणाले आहेत.