गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच; गोदावरीची पूरपातळी स्थिर

नाशिक : शहरात बुधवारी (दि.१७) पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, अधूनमधून हलक्या व मध्यम सरी कायम आहेत. सकाळच्या सुमारास नाशिककरांना सूर्यदर्शन झाले असले तरीही दुपारनंतर मात्र पुन्हा पावसाला सुरूवात झाली. दुसरीकडे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांसह अन्य काही तालुक्यात संततधार कायम असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच असला तरी गोदावरीची पाणी पातळी कमी झाली आहे.
गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीपातळीदेखील वाढते आहे.

मंगळवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता गंगापूर धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी (दि.१७) सकाळी ६ वाजेपासून ३ हजार ६१८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने गोदावरीच्या पाणी पातळीतही घट झाली. नांदुर मध्यमेश्वरमधून जायकवाडीला विसर्ग ः नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीपात्रात ३२ हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात नांदूरमध्यमेश्वरमधून ६१ टीएमसी ४० लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले. वरच्या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणातूनही ४७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीचे १८ दरवाजे तीन फूट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

धरणांत ९२ टक्के पाणीसाठा ः जिल्ह्यातील धरणांमध्ये ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातील आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसंगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नउ धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर इतर धरणांमध्येही ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.