दारणातून विसर्ग; भावली धरण तुडुंब

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर कायम

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी काल तिसर्‍या दिवशी पुन्हा पावसाने जोर धरत बरसात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९६% भरलेले भावली धरण रविवार (दि. २५) रोजी सकाळी ६ वाजता शंभर टक्के भरुन ओसंडले. भावली, भाम आदि नदयांना पुर आला आहे. त्यामुळे दारणा च्या जलाषयात जवळपास ८० % पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ब्रिटिशकालीन धरणाच्या सहा वक्राकार स्वयंचालित दरवाजातुन सकाळी ११ वाजता यंदाचा पहिला मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यातून १ हजार २४१ तर जलविद्युत प्रकल्पग्रहातून ५५० असा एकूण १ हजार ७९१ क्यूसेक ने विसर्ग सुरु झाला आहे. दरम्यान, सायंकाळी ६ पर्यंत अडीचहजार क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला होता.

तालुक्यात आज २५ जुलै रोजी सकाळ पर्यंत एकूण जवळपास १७०० मिमी पाऊस पडला आहे. गत वर्षाच्या सरासरिने पाऊस बरसत आहे.मुकणे धरणात देखील ४३ टक्के पाण्याचा संचय झाला असुन कड़वा,भाम, वाकी यात देखील पाण्याची पातळी वाढत आहे. तालुक्यातील छोटे मोठे पाझर तलाव भरून वाहु लागले आहेत. अनेक दिवसांपासून ची पावसाची तूट या निमित्ताने भरून निघत आहे. त्यामुळे नगर, राहता, कोपरगांव, औरंगाबाद आदि भाग समाधान व्यक्त करता आहे.