घरताज्या घडामोडीआयटी हबवरुन महापौरांना घरचा आहेर, पालिका महासभेत खडाजंगी

आयटी हबवरुन महापौरांना घरचा आहेर, पालिका महासभेत खडाजंगी

Subscribe

विशेष महासभेत गोंधळ, प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप, भ्रष्टाचाराचे आरोप

नाशिक – औद्योगिक वसाहतीमधील आयटी हबची जागा अनेक वर्षांपासून वापराविना पडून असताना, महापौरांनी मात्र आडगाव येथील केवळ १० एकर जागेवर आयटी हब उभारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.२९) झालेल्या विशेष महासभेवर ठेवला. आयटी हबसंदर्भात नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना नसताना हा विषय ठेवण्यात आल्याने दस्तुरखुद्द भाजपच्याच नगरसेवकांनी या विषयाला तीव्र विरोध दर्शवला. या विषयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव निमसे यांनी पालिका प्रशासनासह महापौरांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

दीड वर्षांनंतर महापालिकेची पहिलीच विशेष महासभा शुक्रवारी झाली. त्यात महापौरांनी स्वतःहून आयटी पार्क उभारणीचा प्रस्ताव सादर केला. नगरसेवकांना यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी या विषयाला तीव्र विरोध दर्शवला. महापालिकाहद्दीत औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून आयटी हबसाठीची इमारत उभी आहे. त्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही त्याचा कोणताही वापर झालेला नाही. सुमारे ३० हजार स्केअर फूटांच्या या इमारतीची घरपट्टीदेखील महापालिका वसूल करते. त्यासाठी महापौरांनी गेल्या ५ वर्षांत कधी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार बिल्डरधार्जिना असल्याचा आरोप नगरसेवक शशिकांत जाधव यांनी केला.

- Advertisement -

बिल्डर्सच्या लाभासाठी घाट

आयटी हबचा विषय अचानक कसा आला आणि महापौरांनी परस्पर तो का ठेवला, यात संशयाला जागा आहे. नव्या आयटी हबसाठी जागा विकसित करण्यासाठी घ्यायची आणि त्यातून बिल्डर्सचा फायदा करायचा, असा घाट घातला जातोय. आमच्या भागातील शेतकरी भाडेकरारावर जागा द्यायला तयार असताना, हा अट्टहास का? 2012 सालात शेतकर्‍यांकडून संपादीत केलेल्या जागांचा मोबदला महापालिकेने अद्याप अदा केलेला नाही. आता मात्र, या जागेचा अट्टहास केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. यात मोठी मिलिजुली आहे.
– उद्धव निमसे, भाजप नगरसेवक, पंचवटी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -