घरताज्या घडामोडीभाजप नगरसेवकाने दाखवला गटनेत्याला सभागृहाबाहेरचा रस्ता

भाजप नगरसेवकाने दाखवला गटनेत्याला सभागृहाबाहेरचा रस्ता

Subscribe

शिक्षण समिती निवडणुकीतील प्रकार; अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

महापालिकेतील शिक्षण समितीची निवडणूक भाजपसाठी एकतर्फी झाली असली तरीही या निवडणुकीत भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले. निवडणुकीदरम्यान, व्हीपवरुन भाजप गटनेता जगदीश पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्यात वाद झाले. यावेळी नाराज झालेल्या गांगुर्डे यांनी थेट पीठासन अधिकार्‍यांकडे तक्रार करीत पाटील यांना सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवला.
या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी दिसून आली. पक्षाने मोबाईलवर बजावलेला व्हीप स्वीकारल्याचे सांगत ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी लेखी व्हीप स्वीकारण्यास नकार दिला. मात्र निवडणूक सभेतच भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी गांगुर्डे यांना लेखी व्हीप स्वीकारण्याचा आग्रह धरला. पाटील यांच्याकडून अविश्वास दाखविला जात असल्याचे बघून त्यावर नाराज झालेल्या गांगुर्डे यांनी पाटील यांच्या निवडणूक सभेतील उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे पिठासन अधिकार्‍यांनी पाटील यंना सभागृहाबाहेर पाठवले.

शिक्षण समिती भाजपकडे; सेनेच्या उमेदवाराला एकच मत

नाशिक: सभापतीपदासाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही उमेदवारी अर्ज भरणार्‍या शिवसेनेला शिक्षण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने धोबीपछाड केले. त्यामुळे प्रथमच दुसर्‍यांदा सभापती होण्याचा मान भाजपच्या संगीता गायकवाड यांनी मिळला. सेनेच्या सदस्याची अनुपस्थिती आणि स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे यांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे शिवसेनेच्या ज्योती खोले यांना स्वत:च्याच अवघ्या एका मतावर समाधान मानावे लागले. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत खोले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या शाहीन मिर्झा यांना सलग दुसर्‍यांना उपसभापतीपदी बिनविरोध निवडीचा मान मिळाला.

- Advertisement -

अशी पार पडली निवडणूक प्रक्रिया

महिला व बालकल्याण समितीच्या सभागृहात शुक्रवारी(दि.५) विभागीय महसुल आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडीची विशेष सभा पार पडली. या नऊ सदस्यीय समितीत सर्वाधिक पाच सदस्य असलेल्या सत्तारूढ भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती, उपसभापती भाजपचाच होणार हे निश्चित होते. शिवसेनेने ज्योती खोले यांच्या रुपाने या निवडणूक रिंगणात उडी घेत भाजपला आव्हान दिले होते. माघारीची मुदत संपेपर्यंत खोले या सभागृहात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे रेटली गेली. निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर खोले या सभागृहात दाखल झाल्या. हात उंचावून झालेल्या मतदान प्रकियेत गायकवाड यांना स्वत:च्या मतासह भाजपचे शिवाजी गांगुर्डे, सरिता सोनवणे, शाहीन मिर्झा व हेमलता कांडेकर अशी पाच मते मिळाली. राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले व शिवसेनेच्या किरण गामणे या निवडणूक सभेस उपस्थित नव्हत्या. सेनेचे शिक्षण समितीतील अन्य सदस्य सुनील गोडसे हे स्वीकृत नगरसेवक असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने खोले यांनी स्वत:चे केवळ एक मत मळू शकले. त्यामुळे पीठासन अधिकार्‍यांनी गायकवाड यांना विजयी घोषित केले. त्यानंतर झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सेनेच्या खोले यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या मिर्झा यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.

सलग दुसर्‍यांदा गायकवाड सभापती तर शाहीन मिर्झांची उपसभापतीपदी निवड

कोरोनामुळे गेली वर्षभर शाळा बंद असल्याने या समितीच्या मावळत्या सभापती संगीता गायकवाड व उपसभापती शाहीन मिर्झा यांना काम करण्याची फारशी संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे भाजपने सलग दुसर्‍यांदा गायकवाड व मिर्झा यांना अनुक्रमे सभापती, उपसभापतीपदासाठी उमेदवारी दिली होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिक्षण समिती सभापती आणि उपसभापतीपदी सलग दोन वेळा त्याच नगरसेवकांची निवड झाली आहे.

भाजप नगरसेवकाने दाखवला गटनेत्याला सभागृहाबाहेरचा रस्ता
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -