शिर्डीत हार-फुलं आणि प्रसादाचा वाद शिगेला, विक्रेते आक्रमक; आंदोलनाचा इशारा

नाशिक – कोरोना काळात शिर्डीच्या साईबाबा (Sai Baba temple in shirdi) मंदिरात हार-फुले घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. हा नियम अद्यापही कायम असल्याने ग्रामस्थ आणि विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिर्डी ग्रामस्थांनी आज हार-फुले घेऊन मंदिरात प्रवेश केला तेव्हा त्यांनी मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी अडवलं. तेव्हा ग्रामस्थ आणि सुरक्षारक्षांकमध्ये झटपट झाली. तसेच, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन सुरू केलं. मात्र, कायदा सुव्यवस्थेचं कारण देत संस्थानने आंदोलन न करण्याची विनंती केली.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच, सण-उत्सवांच्या वेळेस लाखो भक्त साईबाबा मंदिरात येतात. त्यामुळे आजूबाजूला स्टॉल लावणाऱ्या फुल विक्रेत्यांचा या काळात चांगला व्यवसाय होतो. मात्र, कोरोना काळात हार-फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ती बंदी अजूनही उठवण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी येत द्वारकामाईसमोर आंदोलन केले. तसंच, शुक्रवारी मंदिरात येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईन म्हणून संस्थानने आंदोलन न करण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. मात्र, आंदोलनावर ठाम असल्याचं संजय काळे यांनी पुन्हा पत्राद्वारे कळवलं आहे.

दरम्यान, विश्वस्त मंडळाला कोणतंही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मज्जाव असताना हा निर्णय कसा लागू करण्यात आला असा सवाल संजय काळे यांनी पत्रातून विचारला आहे.