नाशिकमधील नवशा गणपती देवस्थान ट्रस्टचा १५ वर्षे जुना वाद अखेर मिटला

धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांची भूमिका ठरली दिशादायी

Navshya_Ganpatil

नाशिक येथील ऐतिहासिक देवस्थान असलेल्या श्री नवशा गणपती मंदीर ट्रस्टचा वाद अखेर गुरुवारी (दि.२५) मिटला. या प्रकरणात धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी ठाम भूमिका घेत १३ विश्वस्तांची नियुक्ती केल्याने सर्व गटांनी त्याला संमती दिली.

नाशिक शहरातील जागृत व ऐतिहासिक देवस्थान असलेल्या श्री नवशा गणपती मंदिराच्या ट्रस्ट नोंदणीपासून वादाला सुरुवात झाली होती. नोंदणीनंतर केलेली घटना वादात आली होती. यामुळे सुमारे १५ वर्षापासून ट्रस्टचे कामकाज वादात अडकले होते. या ना त्या कारणामुळे वाद निर्माण होत असल्याने ट्रस्टचा विकास खुंटला होता. देवस्थानच्या जागेचे मालक व ट्रस्टी मंडळातील वाद धर्मादाय आयुक्तालयात प्रलंबित होता. या प्रकरणात आयुक्त झपाटे यांनी सर्व पक्षांना समान संधी देत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. तसेच, वाद मिटवून देवस्थानचा विकास करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी गुरुवारी आयुक्तांसमोर झाली. जागा मालकांचे चार प्रतिनिधी, तर परिसरातील नऊ असे विश्वस्त मंडळ नियुक्त करून यातून तोडगा काढण्यात आला.