घरताज्या घडामोडीमहासभेत गदारोळ: स्मार्ट कामांवरून महापौर - सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक

महासभेत गदारोळ: स्मार्ट कामांवरून महापौर – सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक

Subscribe

, स्मार्ट कंपनी बरखास्तीची मागणी, संयुक्त पाहणीचा निर्णय

स्मार्ट सिटी अंतर्गत रविवार कारंजा, दिंडोरी नाका येथे सुरू असलेल्या ट्रायल रनवरून महापौर सदस्यांमध्ये चांगलीच खंडाजंगी उडाली. शिवसेना विरोधी पक्षनेत्यांकडून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक महापालिकेची महासभा आज घेण्यात आली. महासभेच्या प्रारंभीच काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी रविवार कारंजा आणि दिंडोरी नाका येथे सुरू असलेल्या ट्रायल रनचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवकांसह महापालिका अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ही कामं सुरू आहे. त्यामुळे शहरातल्या वाहतुकीचा पुरता फज्जा उडाल्याचंही खैरे यांनी सांगितलं. गोदाघाटावर स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू असलेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी महापालिका ३० टक्के निधी देते मात्र महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला विश्वासात न घेता कंपनी मनमानी पद्धतीनं काम करत असल्याचं सदस्यांनी सांगितलं. ही कामं पूर्ण झाल्यानंतर ती महापालिकेकडे हस्तांतरित केली जातील. मात्र, आपले अधिकारीच अनभिज्ञ असल्यानं ही योजनाच फसवी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका यांच्यात कुठलाही समन्वय नाही. स्मार्ट कंपनीचे अधिकारी मनमानी पद्धतीनं काम करत असल्यानं त्यांची केंद्र सरकारमार्फत चौकशी करण्याचा ठराव महासभेत करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सदस्यांच्या भावना ऐकल्यानंतर महापौरांनीही स्मार्ट सिटीच्या कामांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. हाच धागा पकडत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी ‘तुम्ही सत्तेत असताना टीका का करता, आपणच हताश असाल तर सभागृहाने आपल्याकडून काय अपेक्षा बाळगावी, टीका न करता कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महापौरांनी बोरस्ते यांना आपण योग्य शब्दप्रयोग करण्याची सूचना करताच सभागृहात गदारोळ झाला.

आम्हाला शिकवू नका

बोरस्ते आपण या कंपनीवर संचालक असताना काय केले असा प्रतिसवाल महापौरांनी केला. आम्हीदेखील सभागृहात २५ वर्षे काम केलंय त्यामुळे आम्हाला शिकवू नका, असं महापौरांनी सांगताच शिवसेना सदस्य आणि महापौरांमध्ये तू तू – मैं मैं झाली. अखेर काही वेळाने हा वाद शांत झाल्यानंतर पुन्हा चर्चेला सुरूवात झाली. सदस्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, असा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -