जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी ‘कोविड वॉर रूम’ सज्ज

corornavirus new variant deltacron, what is deltacron
ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण

नाशिक : कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता यावी, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज करण्यात आली आहे. परिस्थिती हाताळताना नियोजनात कसूर राहू नये यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली असून राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. पहिल्या दोन लाटांइतका ओमायक्रॉन व्हेरियंट घातक नसल्याची आरोग्य यंत्रणांची निरीक्षणे आहेत. परंतु, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत जाणे हे ओमायक्रॉनचे वैशिष्ट्ये ठरत असून, जिल्ह्यातदेखील रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमायक्रॉनचे हे संकट तीव्र होऊ नये, ते वेळीच थोपविता यावे, याकरिता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यापूर्वी दोन लाटांमध्ये केलेल्या नियोजनामुळे परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली गेली. यंदाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रत्येक अधिकार्‍यावर जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे जर नाशिकमध्ये दुसर्‍या लाटेप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यास नियोजन करणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

अधिकारी आणि जबाबदार्‍या

 • निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे : कोरोना मयत वारसांना द्यावयाच्या मदतीचे नियंत्रण
 • उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे : लसीकरण मोहिमेचे नियंत्रण
 • उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे : कोविड रुग्णालय व्यवस्थापन
 • अरविंद नरसीकर : ऑक्सिजन पुरवठा
 • उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी : कोविड निधी मागणी व वितरण
 • उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे : शासन उपाययोजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देणे
 • वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार : कोविड दैनंदिन माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे
 • उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे : कोविड नियमांची अंमलबजावणी
 • जिल्हा उपनिबंधक सतीश खरे : सामाजिक संस्थांनी देऊ केलेल्या मदतीचे नियोजन करणे
 • जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख : रुग्णालयांची तपासणी
 • डॉ. दुधेडिया : लॅबचे नियंत्रण
 • उपजिल्हाधिकारी वासंती माळी :सर्व अधिकार्‍यांचा दैनंदिन अहवाल सादर करणे.