डीएनए रिपोर्टमुळे बलात्कारी सिद्ध; ७ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत बलात्कार करून ठेवले होते गर्भवती; २०१६ मधील घटनेत न्यायालयाकडून निर्णय

Jharkhand15 people sentenced to death by Jharkhand court for killing jail inmate

नाशिक : अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष देत तिच्यावर बलात्कार करणार्‍या आणि तिच्या अज्ञानाचा फायदा उचलत गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अनिल खंडेराव गायकवाड (रा. वरखेडा) असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे 2016 रोजी वरखेडा गावात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दिले. तिच्यासोबत बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंधही ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. तिने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला ही मात्र जन्मानंतर या अर्भकाचा मृत्यू झाला. अशा स्थितीत संबंधित आरोपीने मुलीला लग्न करण्यास नकार दिल्याने पीडितेने फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल तारगे यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तक्रारदार, पंच, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपास अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांना अनुसरुन पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले.

सहा साक्षीदार तपासले

या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सर्वांची साक्ष, तसेच पीडिता आणि आरोपीचा डीएनए रिपोर्ट महत्वाचा ठरला. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

अल्पवयीनांवर अत्याचार वाढले

अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढल्याचे दिसून येत असून, यापूर्वीच लागलेल्या निकालातही एका अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला वारंवार मारहाण व अत्याचार केल्याप्रकरणी पतीस २० वर्षे सक्तमजुरी व ४५ हजारांचा दंड, तर पोटच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावणार्‍या आई-वडिलांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली होती.