नाशिक : नागरिकांनी घरातल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अशा पर्यावरणपूरक विसर्जना करिता महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक आणि मंडळांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदी, विहिरी किंवा ओढ्यात विसर्जित करू नयेत, असे आवाहन करीत नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेटद्वारे घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील सहा विभागांसाठी पालिका अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही, त्याचे लहानलहान तुकडे जलस्रोतात जाऊन हे स्रोतच बंद करतात. नदी आणि विहिरींचे प्रदूषणही होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून घरगुती गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करा, अशी चळवळ राबविण्यात येत आहे.
पालिकेच्या आवाहनाला नाशिककरांनाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. होता. त्यामुळे यंदाही नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयांमध्ये हे अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यालयांतून अमोनियम बायकार्बोनेट मोफत घेत घरगुती गणेश विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
विभागनिहाय येथे करा संपर्क
- नाशिक पूर्व : सुनील शिरसाठ (संपर्क ९४२३१७९१७३)
- नाशिक पश्चिम बाळू बागुल (संपर्क ९४२३१७९१७५)
- पंचवटी : संजय दराडे (संपर्क ९७६३२५७७७८)
- नवीन नाशिक : संजय गांगुर्डे (संपर्क ९४२३१७९१७१)
- सातपूर : संजय गोसावी (संपर्क ९४२३१७९१७६)
- नाशिकरोड : अशोक साळवे (संपर्क ९४२३१७९१७२)