गणेश मंडळांनी वाहतुकीला अडथळा करु नये

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गणेश मंडळांना दिली समज

गणेशोत्सवात तरुणाईच्या ऊर्जेचा सकारात्मक व रचनात्मक उपयोग करता येईल, यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्नशील रहावे. वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने देखावे, स्टेज उभारु नयेत. गणोशोत्सव समाजपरिवर्तनाचे माध्यम आहे. महिला व मुलीच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक कार्यरत राहणार आहे. उत्सावात गणेश मंडळ व नागरिकांनी पोलिसांचे कान व डोळे व्हावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (ता. २७) प्रसाद मंगल कार्यालय येेथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी व आमदार सीमा हिरे यांनी मार्गदर्शन करत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आमदार सीमा हिरे, समीर शेटे, नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके, नगरसेवक विलास शिंदे, छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रश्नांचा भडीमार

शांतता समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी, कॉलेज तरुणी, गणेश मंडळ कार्यकर्ते, महिला व नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. विसर्जन मिरवणुकीत गणेशमंडळांना कलेचे सादरीकरण करता यावे, यासाठी लवकर मिरवणूक सुरु करावी. मिरवणुकीत व त्यानंतर समाजकंटकांकडून मुलींची छेड काढली जाते, त्यांचा बंदोबस्त करावा. गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांवर भर द्यावा. नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी तुरटीच्या गणेशमूर्तीला प्राधान्य देत पीओपी गणेशमूर्तीवर बंदी आणावी, असे प्रश्न उपस्थितांनी पोलिसांना विचारले.

मंडळांच्या आरतीला किती महिला येतात?

गणेश मंडळे सार्वजनिक ठिकाणी स्टेज उभारुन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मात्र, परिसरातील सोसायट्यांमधील किती महिला उत्स्फूर्तपणे दररोज मंडळांच्या गणेश आरतीला हजेरी लावतात. याचे गणेश मंडळांनी आत्मपरिक्षण करावे, असा निर्मला साठे यांनी उपस्थित मंडळांच्या कार्यकर्त्यांना विचारला. हाच प्रश्न पोलीस आयुत्कांनी सुद्धा उपस्थित मंडळांच्या प्रतिनिधींना विचारला. मात्र, त्यावेळी कोणीही उत्तर दिले नाही.

विसर्जनावेळी बंदोबस्त वाढवा

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीवरील चार ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन आयोजित केले जाते. या ठिकाणी घरगुती गणेशमूर्तीसह गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन ठिकाणी किमान ५ लाख नागरिक असतात. मात्र, त्यावेळी मर्यादित पोलीस बंदोबस्त असतो. यावर्षी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी. रस्त्यावर ठिकठिकाणी स्पीड बेकर्स उभारावेत. कॉलेज रोड परिसरात बेशिस्त पार्किंग केले जाते, त्यावर कारवाई करावी.  – विलास शिंदे नगरसेवक