घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोरी थांबेना ! भूमी अभिलेख अभियंता लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात

लाचखोरी थांबेना ! भूमी अभिलेख अभियंता लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्यात लाचखोरी कमी होताना दिसत नाहीये. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एका लाचखोर अधिकार्‍याला ताब्यात घेतले आहे. नाशिक शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधिक्षकाला ५० हजारची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जमीन मोजणीमध्ये हद्द कायम करण्याच्या मोहबदल्यात एक लाख रुपयांची मागणी भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे याने तक्रारदाराकडे केली होती. एक लाख रुपयापैकी ५० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक महेशकुमार शिंदे याच्यासह लिपिक अमोल भीमराव महाजन याला अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक जिल्ह्यातील एका गावातील जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज भूमी अभिलेख कार्यालयाला प्राप्त झाला होता. मोजणी झाल्यानंतर पोट खराबा कमी जास्त करण्यासाठी महाजन याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. तक्रारदाराला अधीक्षक महेशकुमार शिंदे यास भेटण्यास पाठवले असता शिंदेने तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा करून सापळा रचला आणि अधीक्षक शिंदे तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेताना पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. शिंदे याच्याकडे नाशिक विभागातील तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कारभार असल्याची माहिती समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

- Advertisement -

दरम्यान, या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -