नाशिक : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. कपिल आहेर यांची नियुक्ती झाली आहे. तालुका आरोग्य अधिकार्यांकडून 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फौजदारी गुन्हा दाखल केलेले आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांचे दि.28 फेब्रुवारी रोजी निलंबन झाले होते. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्याची रजा मंजूर करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यावर डॉ. डेकाटे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डेकाटे यांनी प्रयत्न करून अटकपूर्व जामीन मिळविला होता. गुन्हा दाखल असल्याने त्यांना हजर करून घेण्यास तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नकार दिला होता. मात्र, डॉ. गिते यांच्या बदलीनंतर रूजू झालेल्या तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी डॉ. डेकाटे यांना हजर करून घेतले होते. याच दरम्यान, प्रशासनाने डॉ. डेकाटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता.
जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ.कपिल आहेर
महिन्याभरापासून रिक्त पदावर नियुक्ती; करोनाशी सामना करण्याचे आव्हान