लॉकडाऊनमध्ये दारूडयांचा महिलेच्या घरासमोर धिंगाणा 

दोघांवर गुन्हा दाखल, पंचवटीतील घटना

Drinking

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले असून मद्यविक्रीची दुकाने बंद असताना दोन दारुडे महिलेच्या घरासमोर दारू पीत धिंगाणा घातल्याची घटना मायको रुग्णालयासमोर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी मानसी चेतन मिस्तरी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी उद्धव व रोशन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उद्धव व रोशन हे मानसी मिस्तरी यांच्या घरासमोर दारू पीत बसले होते. महिलेने दोघांना हटकले.तुम्ही येथे दारू पीत बसू नका, दारूच्या बाटल्या फोडू नका, मुलाला खेळताना काचा लागतील, असे त्यांनी दोघांना सांगितले. राग अनावर झाल्याने दोघांनी महिलेस शिवीगाळ व मारहाण केली. महिलेची आई मध्यस्थी झाली असता त्यांनाही दोघांनी मारहाण केली. तु आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुझ्या नवऱ्याला मारू, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार वारघडे करत आहेत.

नदीकिनारी आढळला अनोळखी मृतदेह

शहर पोलिसांना रात्रगस्तीदरम्यान मोदकेश्वर मंदिराजवळ, गोदावरी नदीकिनारी येथे आढळला. मृताचे अंदाजे वय 65 आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. पाळदे करत आहेत.

चक्कर आल्याने वृध्दाचा मृत्यू

घराजवळ शतपावली करत असताना चक्कर आल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अशोक भाऊराव जगताप (65, रा. राजवाडा, काळे चौक, भद्रकाली) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक पाटील घराजवळ शतपावली करत होते. त्यावेळी त्यांना चक्कर आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी त्यांच्या मुलाने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार दळवी करत आहेत.