एटीम कार्ड ब्लॉक केल्याने आई, बहिणीला मारहाण

इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा

a hooligan robbed 20 thousand at chopper point

आईने एटीएम कार्ड ब्लॉक केल्याचा राग मनात ठेवून मुलाने आईला मारहाण केल्याची घटना वडाळा गावात घडली. बहिणीने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जुबेदा निजामुद्दीन शेख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी समीर ऊर्फ सोनू निजामद्दीन शेखवर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित समीर शेख दारूच्या आहारी गेल्याने जुबेदा शेख यांनी जॉईंट अकाउंटचे एटीएम कार्ड ब्लॉक केले. आई जुबेदा शेख या बहीण रेश्माच्या घरी असल्याची माहिती त्याला समजली. दारूच्या नशेत तो बंदुक घेऊन रेश्माच्या घरी आला. बंदुकीचा पाठीमागील लोखंडी भागाने जुबेदा शेख यांच्या डोक्यात जोरदार मारला. घरातील किमती वस्तूंची नासधूस करत बहीण रेश्मा शेख हिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि फरार झाला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक जाकीर हुसेन शेख पुढील तपास करत आहेत.

संशयित अट्टल गुन्हेगार

समीर ऊर्फ सोनू शेख हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. भद्रकाली पोलिसांनी त्याला गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत ठेवले असता त्याने डोके फोडून घेतले होते तसेच इंदिरानगर पोलीसांनी त्याला अटक केली असता कारवाई टाळण्याच्या हेतूने स्वत:च्या हातावर त्याने ब्लेडने वार केले होते.