घरक्राइमअमोल इघेंच्या खूनप्रकरणी पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अमोल इघेंच्या खूनप्रकरणी पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Subscribe

प्रवीण दरेकर यांची मागणी; बर्वेला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा आरोप

नाशिक : कामगार युनियनच्या वर्चस्ववादातून भाजपचा मंडल अध्यक्ष अमोल इघे याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर लटवण्यासाठी हा मुद्दा येणार्‍या अधिवेशनातही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्यातील युनियच्या वादातून भाजपचा मंडल अध्यक्ष इघे याचा विनायक बर्वे याने भरदिवसा खून केला. बर्वे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून पालकमंत्र्यांसोबतचे त्याचे फोटो आहेत. त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, पालकमंत्री भुजबळांचा त्यांच्यावर वरदहस्त दिसल्याचा घणाघाती आरोप दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि.२८) अमोल इघेच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेतली. यानंतर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, आमदार डॉ.राहुल आहेर, अ‍ॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, धुळ्याचे खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री पाशा पटेल यांसह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिका केली. ते म्हणाले, ‘नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात चार खून झाले. त्यामुळे नाशिक शहर हे गुन्हेगारी नगरी होते की काय? असा प्रश्न पडतो. दोन दिवसांपूर्वी इघे याची हत्या झाली. या प्रकरणातील हत्यारा बर्वे याला राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बळ होते.

- Advertisement -

आपल्या पक्षाची युनियन तेथे लागत नाही म्हणून त्यांनी अमोल इघे याची भरदिवसा हत्या केली. बर्वे याने येथे लावलेल्या महाराष्ट्र वंचित आघाडीच्या फलकावर पालकमंत्री भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. तसेच समीर भुजबळ हे या ठिकाणी जावूनही आल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची याला साथ असल्याचा आरोपही त्यांनी केला. हत्यारा बर्वे याच्यावर ‘मोक्का’सारखी कारवाई व्हायला हवी. पोलीस आयुक्तांच्या दुर्लक्षामुळेच हा खून झाला. परंतु, ते कुणाचे नोकर असल्यासारखे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरेकरांचे आरोप

- Advertisement -

राजकीय आश्रयामुळे अमोल इघेची हत्या

•हत्यारा विनायक बर्वेला राष्ट्रवादीचा आश्रय

•माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्याची भेट घेतल्याचा आरोप

•नाशिकमध्ये एका आठवड्यात चार खून झाल्याने गुन्हेगारी नगरी म्हणून नाशिकची ओळख

•विनायक बर्वे सूटला तर कायद्यावर विश्वासच राहणार नाही

•पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या दुर्लक्षामुळेच अमोल इघेचा खून

•पोलीस आयुक्त नोकर असल्यासारखे वागतात

•पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचलेला असताना पोलीस आयुक्तांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले

•देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

•महाराष्ट्रात बलात्कार, खून आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ

•राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीव गेले

•मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे गेले

•ओबीसी आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पूर्तता नाही

•पेट्रोलवरील दर कमी करण्यापेक्षा विदेशी मद्यावरील 150 टक्के कर या सरकारने कमी केला

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -