घरमहाराष्ट्रनाशिकरहिवाशांच्या रोषापुढे पालिकेचे 'पिछे मूड'

रहिवाशांच्या रोषापुढे पालिकेचे ‘पिछे मूड’

Subscribe

काझी गढीचा प्रश्न बनला ज्वलंत; दिवसभरात एकाच कुटुंबाचे स्थलांतर

अत्यंत धोकादायक बनलेल्या काझी गढीवरील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी टाकलेले पाऊल महापालिका प्रशासनाला स्थानिकांच्या तीव्र रोषामुळे शनिवारी, ६ जुलैला मागे घ्यावे लागले. रहिवाशांची कायमस्वरुपी पर्यायी व्यवस्थेची मागणी पआणि दुसरीकडे कोणत्याही क्षणी आपत्ती कोसळण्याची शक्यता, अशा दुहेरी पेचात सापडलेल्या महापालिका अधिकार्‍यांची झोप उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांच्या मध्यस्थीने पालिकेला एका कुटुंबाचे स्थलांतर करण्यात यश आले.

जिर्ण वाडे आणि भिंती कोसळून राज्यभरात जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धोकादायक बनलेल्या काझी गढीचा प्रश्नदेखील चव्हाट्यावर आला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांचेही आता कोणत्याही क्षणी स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने शुक्रवारपासूनच सुरू केली आहे. त्यासाठी गाडगेबाबा धर्मशाळेसोबतच बी. डी. भालेकर हायस्कूल इमारत आणि चव्हाट्यामधील रंगारवाडा या पालिका शाळांत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

विविध यंत्रणा तळ ठोकून

रहिवाशांचे स्थलांतर, विरोध आणि धोका लक्षात घेता टाळकुटेश्वर मंदिर परिसरात अग्निशमन दल, अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांची कुमक दाखल झाली. दुपारी ३ पासून स्थलांतराच्या दिशेने हालचाली गतीमान झाल्या. मात्र, सायंकाळी साडेपाचनंतर यंत्रणेने काढता पाय घेतला.

मनधरणीचे सर्व प्रयत्नही व्यर्थ

२०१३ सालात काझी गढीची भिंत ढासळून ३० घरे खचली होती. या घटनेनंतर अनेक कागदी घोडे नाचले. मेरीने या ठिकाणी संरक्षक भिंतीचा पर्याय सूचवला होता. या घटनेला सहा वर्षे उलटूनही अद्याप लाल फितीमधून ना भिंत उभी राहिली ना रहिवाशांना पर्यायी घरांचा पर्याय दिला गेला. पालिकेच्या अशा कारभारामुळे येथील रहिवाशांच्या मनधरणीचे प्रयत्नदेखील व्यर्थ ठरले. येथील किमान १५ ते १८ घरे कोणत्याही क्षणी कोसळू शकतील, अशा स्थितीत आहेत. त्यांचा विचार करुन पालिकेला तातडीने ज्वलंत बनलेला हा विषय मार्गी लावावा लागणार आहे.

- Advertisement -

रहिवासी म्हणतात…. स्थलांतरास तयार, मात्र हक्काची घरे द्या!

गढी असुरक्षित आहे, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही स्थलांतराला तयार आहोत. पण मनपा आम्हाला राहण्यासाठी कायम स्वरुपी सदनिका उपलब्ध करुन देणार आहे का. मनपाने पूवीपासुन आमच्याकडून कर रुपाने पाणीपट्टी, घरपट्टी घेतलेली आहे. महावितरणचे विज बिल आम्ही भरतो. त्यामुळे आमचा घराचा हक्क आहे. पण मनपाने घर दिलेले नसल्याने येथे जिवाला धोका असूनही आम्हाला नाईलाजाने येथे राहावे लागते, हे अतिशय खेदजनक आहे. मासिक उत्पन्न आठ हजार आहे त्यामुळे आमची आर्थिक अडचण आहे. मनपा जो पर्यंत पर्यायी जागा देत नाही, आम्ही येथेच राहणार. माळीणसारखी दुर्घटना घडली तरी चालेल. – भारती वाघ, काझीची गढी रहिवासी

येथे मी आणि माझी आई असे दोघेच राहातो. महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला घर सोडण्याचे आवाहन करते. कायमस्वरुपी हक्काची जागा काही देत नाही. पावसाच्या दिवसात गाडगेबाबा धर्मशाळेत तात्पुरता निवारा देतात. नंतर काय, असा प्रश्न आम्ही पालिकेला दरवर्षी करतो. मनपाने आमची राहण्याची कायम स्वरुपी सोय करावी ही आमची मागणी आहे. – राणी कराटे, रहिवासी

गेल्या 30-40 वर्षापासून आम्ही काझीच्या गढीवर राहतो आहोत. ही गढी ढासळून असुरक्षित झाल्याचे महापालिकेनेच अनेकवेळा जाहीर केलेले आहे. गढीला एवढ्या वर्षांत संरक्षक भिंत का नाही बांधली. आम्हाला स्थलांतरित करण्यापूर्वी पालिकेने नवीन घरे द्यावीत किंवा गढीला संरक्षक भिंत तरी बांधावी. अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराज धर्मशाळेत व्यवस्था केली जातेय. तेथे तीन ते चार दिवस थांबल्यानंतर आम्हाला पुन्हा गढीवर राहायला यावे लागते. आम्हाला हक्काची जागा हवी आहे, ती किधी मिळणार? – ताराबाई खैरनार, रहिवासी महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -