४० ग्रामपंचायतींचा धुरळा; कमी पावसाच्या तालुक्यांत निवडणुका

नाशिक : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणुक आयोगाने जिल्हयातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान तर ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे.

जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून ते सप्टेबर २०२२ या कालावधीत मुदत संपुष्टात येणार्‍या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचाय सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती वगळता आयोगाकडून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोगाला सादर करण्यात आला होता. यानुसार जिल्ह्यातील बागलाण (१३), निफाड(१), सिन्नर(२), येवला(४), चांदवड(१), देवळा(१३) आणि नांदगाव(६) या तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतीमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • ५ जुलै २०२२ – तहसीलदार हे निवडणुक नोटीस प्रसिद्ध करतील
  • १२ ते १९ जुलै – नामनिर्देशनपत्रे मागविणे
  • २० जुलै – दाखल नामनिर्देशनपत्र छाननी करणे
  • २२ जुलै- नामनिर्देशनपत्र माघार
  • २२ जुलै- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
  • ४ ऑगस्ट – मतदान कार्यक्रम घेणे
  • ५ ऑगस्ट – मतमोजणी व निकाल
  • ११ ऑगस्ट- निकालाची अधिसूचना काढणे