घरमहाराष्ट्रनाशिकराजकारणातील ‘मतलबी’ वारे!

राजकारणातील ‘मतलबी’ वारे!

Subscribe

राजकारण आणि सत्ताकारण ही दोन्ही प्रमेयं एकरूप होत चाललेली दिसत आहेत. विरोधी गोटात राहूनही राजकारण करता येत असले तरी कार्यकक्षा तेवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याला सत्ताकारणाची जोड मिळवणे, हा आजच्या नेतेमंडळींचा अजेंडा बनला आहे. वर्षानुवर्षे सत्तेची फळे चाखणार्‍या काँग्रेस संस्कृतीतील नेत्यांना आपला पक्ष पुरता गाळात गेल्याची जाणीव झाल्याने त्यांनी सत्तांतराचा मार्ग अंगिकारला आहे. नाशिकमध्येही पक्षांतराचे पेव फुटले आहे. जिल्हा राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या छगन भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजकारणातील या मतलबी वार्‍यांना रोखू शकण्याचे काम केवळ जनता जनार्दनच करू शकते...

कधी नव्हे अशा ‘बॅड पॅच’मध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीतील नेत्यांचे इन्कमिंग होत असल्याने सत्तेतील भाजप-शिवसेना सध्या खुशीत आहेत. अनेक पिढ्या काँग्रेस संस्कृतीशी इमान राखलेल्या बड्या घराण्यांना कधीकाळी जातीयवादी वाटणारे आजचे सत्ताधारी उद्याचे तारणहार वाटल्याने राजकीय सोयीपोटी ही मंडळी बिनदिक्कतपणे प्रवाह बदलून घेताना दिसताहेत. आयारामांचा हा समुच्चय अलीकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या नाशिक जिल्ह्यातही पक्षांतरांच्या लगबगीत असल्याचे दिसून येतेय. दिंडोरीच्या धनराज महाले व रामदास चारोस्करांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला ‘बाय’ म्हणत शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. इगतपुरीच्या सलग दोनदा आमदार राहिलेल्या निर्मला गावीतही ‘मातोश्री’चरणी लीन झाल्या. या घटनांकडे अपेक्षित म्हणून पाहिले जात असले तरी खर्‍या अर्थाने ‘हाय होल्टेज ड्रामा’ सुरू झाला तो राष्ट्रवादीचे बाहुबली नेते छगन भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेमुळे. राजकीयदृष्ट्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भूकंप घडवणार्‍या या वार्तेने सार्वत्रिक खळबळ माजणे स्वाभाविक आहे.

धनराज महाले यांची लोकसभा निवडणुकीत मात्रा न चालल्याने आणि विधानसभेत काही हाती न पडण्याची शक्यता गडद झाल्याने त्यांनी घरवापसी केली. चारोस्करांची निष्ठा काँग्रेसला वाहिली असली तरी वार्‍याची दिशा ओळखून त्यांनी लोकसभेप्रसंगी भाजपच्या डॉ. पवार यांना ‘हात’ देत युतीसोबतचा दोस्ताना घट्ट करून घेतला. तथापि, उद्याच्या जागावाटपाचा अंदाज घेत कमळावर स्वार होण्याऐवजी त्यांनी सेनाप्रवेशात धन्यता मानली. आता प्रश्न आहे की सेनेची पसंती महाले ठरतात की चारोस्कर? तिकडे इगतपुरीत नामोनिशाण मिटलेल्या काँग्रेसला धक्का देत निर्मला गावीत यांनीही शिवसेना प्रवेशाची पर्वणी साधली. एकतर निवडून येण्याची शाश्वती नसणे आणि भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे अडचणीत न येण्याचा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गावीतांचा सेनाप्रवेश झाल्याचे बोलले जाते. त्याचा जनता करायचा तो फैसला निवडणुकीत करेल. इथेपर्यंत ठीक असताना अचानक भुजबळ पिता-पुत्र सेनेत घरवापसी करण्याची बातमी सर्वत्र झळकू लागली. या दिवशी, त्या तारखेला भुजबळ ‘मातोश्री’ वर जाऊन घरवापसी करणार वगैरे चर्चांना उधाण आले. बरं, या परिस्थितीत ना भुजबळ, ना उद्धव यांनी प्रवेश होण्याची शक्यता जोरकसपणे फेटाळली. तथापि, भुजबळ यांच्या जाण्या-येण्याचे उपद्रव्य मूल्य ज्ञात असलेल्यांच्या मनात कालवाकालव सुरू झालीय. तसे ते अपेक्षित देखील आहे. भुजबळांचे राजकीय भवितव्य लवकरच ठरायचे ते ठरेल; तथापि, त्यांनी विपरित निर्णय घेतला तर राजकीय ग्रहणाच्या कळसस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भुजबळ जाण्याचा मोठा फटका बसल्यावाचून राहणार नाही. नाशिकसह अनेक ठिकाणच्या निवडणूक निकालावर त्यांच्या पक्षांतराचा परिणाम होईल. शिवाय, जो ओबीसी समाज आजवर त्यांच्यामुळे पक्षासोबत राहिला, त्याची पाठ दाखवण राष्ट्रवादीला परवडणारी नाही.

- Advertisement -

भुजबळ पिता-पुत्र अनुक्रमे जिल्ह्यातील येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करतात. गतवेळच्या तुलनेत दोघांनाही फारसे अनुकुल वातावरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. छगन भुजबळ यांच्या येवल्यात एकीकडे शिवसेना प्रबळ झाली आहे, तर दुसरीकडे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी शड्डू ठोकल्याने भुजबळ सचिंत झाले आहेत. तिकडे नांदगावला तर ‘पंकज भुजबळ नकोतच’ असा पवित्रा घेऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांची गोची केली आहे. शिवाय, येवला व नांदगावमध्ये पक्ष विकलांग अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय करियर गोत्यात आलेल्या भुजबळ पिता-पुत्रांना पक्षांतराच्या उतार्‍यावाचून गत्यंतर नसल्याची खात्री पटली असावी. तथापि, भुजबळांच्या सेना पुनर्प्रवेशाला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन खुद्द भुजबळ व तिकडे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पत्ते उघड करण्यास कचरत आहेत. भुजबळांचे ज्येष्ठत्व सेनेतल्या वरिष्ठांना खटकणे स्वाभाविक आहे. या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार भुजबळ यांचे राज्याच्या राजकारणातील महत्व बर्‍यापैकी कमी झालेय, शिवाय, त्यांची जेलयात्रा व भ्रष्टाचाराची कथित प्रकरणे शिवसेनेच्या अंगाशी येतील. नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंतही भुजबळ विरोधासाठी सरसावले असून अंतस्थ स्वत;च्या अस्तित्वाची चिंता असताना वरकरणी ‘साहेबांना आत टाकणार्‍या भुजबळांचा पुनर्प्रवेश नको’ म्हणून पाढा वाचण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. अर्थात, काहीही असले तरी उद्या ‘मातोश्री’ने डोळे वटारल्यावर सगळ्यांनाच शांत बसून भुजबळांचे जड अंत;करणाने का होईना स्वागत करण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागणार आहे.

शिवसेना काय अथवा भाजप, सत्ताधारी म्हणून सध्या होणारे ‘इन्कमिंग’ सहेतूक आणि स्वत;ची राजकीय सोय लावून घेण्यासाठी असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून सोयरीक जुळवण्याचा फंडा साधताना ही मंडळी जनता-जनार्दनाला गृहीत धरतात, हे तात्विक अंगाने वेदनादायी ठरावे. राजकीय पक्षदेखील एखाद्याला सामावून घेताना हल्ली त्याचे ‘प्रोफाईल’ तपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आयाराम अडचणीत असला तरी बर्‍यापैकी जनाधार आणि ‘इलेक्टिव मेरीट’ असल्याचे ध्यानी येताच निष्ठावंतांना चडीचूप करून नवगतांना पायघड्या टाकण्यास न कचरण्याचे धोरण आज सर्वमान्य झाले आहे असे यानिमित्त म्हणता येईल. उद्याच्या निवडणूकीत स्वयंसिध्दता अधोरेखित करायची असल्याने भुजबळ किंवा निर्मला गावीत यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे नजरेआड करून संख्याबळाचा खेळ जिंकण्याचे शिवसेनेचे ध्येय राहणार आहे. दुसरीकडे तत्वाधिष्ठित राजकारणाच्या गप्पा मारणार्‍या भाजपला भ्रष्टाचाराची मोहोर उमटलेल्या विखे, मोहिते, पाचपुते, पिचड यांचा सत्ताकारणासाठी उतारा चालल्याचेही लपून राहिलेले नाही. निष्ठेचा बाजार उठलेल्या राजकीय पटलावर उद्या काय होईल, याची चिंता वाहण्याच्या भानगडीत ना नेते पडताना दिसताहेत, ना राजकीय पक्ष. दुसरीकडे राज्यातील प्रमुख विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षांची अवस्था कल्पनेपलीकडे वाईट होताना दिसते आहे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर अविश्वास दाखवताना आपल्या पक्षाचे आता खरे नाही म्हणत अनेकांनी बाहेरचा मार्ग चोखाळला आहे, तर कित्येक कुंपणावर बसले आहेत. नाशिकमधील अनेक योग्य ‘टायमिंग’ आणि संधीच्या शोधात आहेत. त्याहून वाईट अवस्थेत काँग्रेस पक्ष आहे. जनाधार सोडा, पण अनेक तालुक्यांतून हा पक्ष हद्दपार झाला आहे. अर्थात, हा काळाचा महिमा आहे. सत्तेत असताना ‘भुजबळ बोले अन् जिल्हा हले’ अशी भक्कम स्थिती असलेल्या काँग्रेस आघाडीला अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो आहे. युतीचा अभ्युदय आणि आघाडीतील वाताहत हे राजकारणातील मतलबी वार्‍याचे निदर्शक आहे. नेते काय किंवा राजकीय पक्ष, कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचे धोरण अवलंबल्याने जनतेनेच आता या परिस्थितीचे ‘ऑडीट’ करणे गरजेचे आहे. मतदारराजाच्या भूमिकेत ती तशा भूमिेकेत जाते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे, एवढेच यानिमित्त…

राजकारणातील ‘मतलबी’ वारे!
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -