मखमलाबाद शिवारातून आठ तलवारी, दोन चॉपर, फायटर जप्त

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मखमलाबाद शिवारातील पठाडे फार्म येथील प्रणिल प्रकाश पठाडे याच्या घरात प्राणघातक शस्त्रे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडून पोलिसांनी आठ तलावारी, दोन चॉपर आणि एक फायटर असा एकूण ३१ हजार ३०० रुपये किंमतीची प्राणघातक शस्त्रे जप्त केली. प्रणिल प्रकाश पठाडे यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिल पठाडे याच्या घरात प्राणघातक शस्त्रे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी प्रणिल पठाडे याच्या घरातून आठ तलावारींसह दोन चॉपर आणि एक फायटर जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक विशाल काठे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाल करत आहेत.