घरमहाराष्ट्रनाशिकखरिप हंगामावर ‘अल निनो’चे सावट; खरीप हंगाम आढाव बैठकीत व्यक्त झाली भीती

खरिप हंगामावर ‘अल निनो’चे सावट; खरीप हंगाम आढाव बैठकीत व्यक्त झाली भीती

Subscribe

नाशिक : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जून-जुलै महिन्यात अल निनो वादळाचे सावट असून, यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य हवामान बदल व कमी पावसाचे संकेत लक्षात घेत खरिप पीकपद्धतीचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.८) आयोजित जिल्हास्तरीय खरिप हंगाम-2023 नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, यंदा 6.27 लाख हेक्टर क्षेत्र हे खरिप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रानुसार साधारणत: सोयाबीन वगळता 68 हजार 863 क्विंटल विविध पिकांचे बियाणे आणि 2 लाख 60 हजार मे. टन रासायनिक खतांची आवश्यकता असल्याने या उपलब्धतेच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात यावे. खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेत पीककर्जाची उपलब्धता झाली पाहिजे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार कृषी विभागाने घेण्यात येणार्‍या पर्यायी खरिप पिक बियाण्यांचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री भुसे यांनी दिल्या. जागतिक स्तरावर 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने तृणधान्य उत्पादन व वापर वाढण्याच्या आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी शेतीत नवनवीन प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांचे मार्गदर्शन घेवून त्यांच्या यशकथा इतर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत नवीन बदल केल्यानुसार तालुकास्तरावर प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीला देण्यात आले आहेत. तसेच, या अपघातात गर्भवती महिलांच्या मृत्यूचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

पिक विम्याबाबतच्या नवीन धोरणानुसार 1 रूपया भरून शेतकर्‍याच्या नावे पीकविमा उतरविला जाणार असून. इतर हिस्सा रक्कम शासन भरणार असल्याचेही पालकमंत्री भुसेंनी सांगितले. खरिप हंगामासाठी युरियाच्या साठवणीसाठी प्राधान्य देवून त्यादृष्टीने गोदामांची स्वच्छता करण्याच्या सूचना रेल्वे अधिकार्‍यांना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\

- Advertisement -
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आवश्यक : झिरवाळ

पुढील काळात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून पिकविलेल्या शेतमालास बाजारपेठ उपलब्ध झाल्यास निश्चितच शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. धरणातील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरीसाठी अधिकार्‍यांना सूचित करण्याबाबतही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले.

४२०० कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ्य

यंदा खरिप आणि रब्बी हंगामासाठी ४२०० कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ्य ठेवण्यात आले आहे. गतवर्षी रब्बी हंगामात ७०२ कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दीष्ठ्य होते. त्यापैकी ५९८ कोटी रूपये वाटप करण्यात आले. तर, खरिप हंगामासाठी २९४६ कोटींपैकी २३३७ कोटी रूपये कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ३ लाख रूपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येत असल्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -