घरमहाराष्ट्रनाशिकविद्युत दाहिनीमुळे वाचला वृक्षांचा ‘प्राण’

विद्युत दाहिनीमुळे वाचला वृक्षांचा ‘प्राण’

Subscribe

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना प्रत्यक्षात साकरण्याचे पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या विद्युत दाहिनीत सहा महिन्यात २६३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे तब्बल ८४ टन १६० किलो सरपण वाचले आहे.

सुशांत किर्वे

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना प्रत्यक्षात साकरण्याचे पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या विद्युत दाहिनीत सहा महिन्यात २६३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे तब्बल ८४ टन १६० किलो सरपण वाचले आहे. वाचलेले लाकूड आणि झाडांचे सर्वसाधारण वजन याचे मोजमाप केल्यास सहा महिन्यात तब्बल २८१ वृक्ष वाचल्याचे समोर आले आहे. गॅस दाहिनी व विद्युत दाहिन्यांची संख्या शहरात वाढल्यास त्याचा वापर करणार्‍यांच्या संख्येतही आमूलाग्र वाढ होईल.

- Advertisement -

हिंदू धर्मासह अन्य काही धर्मांत अंत्यविधीवेळी अग्निडाग देण्याची परंपरा आहे. लाकडाच्या चितेवर अशा प्रकारचा अग्निडाग दिला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून पर्यावरणाची हानी होत आहे.

पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी शहरातील स्मशानभूमीत मोफत विद्युतदाहिनी ८ सप्टेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली. गत सहा महिन्यात विद्युतदाहिनीत २६३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यातील १३० मृतदेह बेवारस आहेत. त्यामुळे नाशिककरांचा दिवसेंदिवस विद्युतदाहिनीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये विद्युतदाहिनीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ८ सप्टेंबर २०१८ पासून विद्युतदाहिनी अंत्यसंस्कारासाठी खुली करण्यात आली.

- Advertisement -

अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येणार्‍या नागरिकांना कर्मचार्‍यांकडून दाहिनीचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यात येत आहे. त्यास नाशिककर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. १३३ मृतदेहांवर कुटुंबियांच्या संमतीने विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर कुटुंबियांचे शोध न लागल्याने १३० मृतदेहांचे महापालिकेकडून विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकजण पारंपारिक पध्दतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याने वेळ, पैसा व नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास होत आहे. सर्व नाशिककरांनी विद्युतदाहिनीचा वापर केला तर दर दिवशी हजारो टन लाकडांची बचत होऊ शकते.

८४ टन लाकडांची बचत

एक मृतदेह जाळण्यासाठी साधारणत: ८ मण लाकडाचा वापर केला जातो. एक मण म्हणजे ४० किलो. २६३ मृतदेहांना अग्निडाग देण्यासाठी ८४ हजार १६० किलो म्हणजे ८४ टन १६० किलो इतके लाकूड जळण्यापासून वाचले आहे. वृक्ष तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यम आकाराच्या झाडांचे वजन साधारणत: ३०० किलो असते. म्हणजेच सहा महिन्यात तब्बल २८१ झाडे जळण्यापासून वाचली आहेत.

दृष्टीक्षेपात…

  • अग्नीडाग, विद्युतदाहिनी निवडीचे स्वातंत्र्य
  • कल्याणी एंटरप्रायझेस, पुणे यांच्यातर्फे विद्युत दाहिनी कार्यरत
  • विद्युत वीजपुरवठा अचानक गेल्यास जनरेटर सुविधा उपलब्ध
  • विद्युतदाहिनीची सेवा २४ तास मोफत सुविधा उपलब्ध
  • डॉक्टरांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, मृताचे आधारकार्ड आवश्यक
  • बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी पोलीस पंचनामा ग्राह्य
  • १२ तासांसाठी प्रत्येकी एका कर्मचार्‍यांची नियुक्ती
  • अग्नी अंत्यविधीसाठी मोफत ८ मन लाकडे, ५ लीटर रॉकेल, १ पाटी गवर्‍या, १ मडके

दाखला अमृतधाममध्येच द्यावा

अंत्यविधीसाठी नातेवाईक अमृतधाम येतात, त्यावेळी नातेवाईक संबंधित कर्मचार्‍यास आधारकार्ड, मृत्यू प्रमाणपत्र देतात. त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्याचवेळी पुणे महापालिकेप्रमाणे अमृतधाममध्येच नातवाईकांना मृत्यूचा दाखला दिल्यास वेळ, पैसा व श्रमात बचत होईल, असे नाशिककर म्हणत आहेत.

गॅसदाहिनी होणार कार्यान्वित

अमरधाममध्ये अनेक वर्षांपासून डिझेल दाहिनी बसवण्यात आली आहे. आता डिझेल दाहिनीचे रूपांतर गॅस दाहिनीत केले जाणार आहे. त्याचे काम सुरू आहे. एकच विद्युत दाहिनी असल्याने एकाचवेळी अनेक मृतदेह अंत्यसंस्कार आल्यावर वैदिक पध्दतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. गॅस दाहिनी सुरू झाल्यास मृतदेहाचे अंत्यसंस्कार विद्युत आणि गॅस दाहिनीत एकाचवेळी करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -