घरमहाराष्ट्रनाशिकचोरट्यांकडून १२ दुचाकी, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त

चोरट्यांकडून १२ दुचाकी, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त

Subscribe

नाशिक पोलिसांची कारवाई

शहरात घरफोडी व दुचाकी चोरी करणार्‍या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून १२ दुचाकी, सोन्याची लगड व इलेक्ट्रॉनिक्स घरगुती वस्तू असा एकूण ९ लाख १३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील चोरीच्या दुचाकी धुळ्यात विक्री करताना पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे. पोलिसांनी चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशी केली अटक

वाढत्या घरफोड्या, दुचाकीचोरी, सोनसाखळी चोरीसह लूटमारीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी, शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात एका शाळेतील संगणक व इतर साहित्य चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. त्यानुसार अंबड गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला. चोरटे अंबड लिंक रोड येथे असल्याची माहिती पोलीस हवालदार भास्कर मल्ले, शिपाई दिपक वाणी यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळ रचला. सापळ्याची चाहूल लागल्यामुळे चोरटे तीन दिवस या भागात फिरकले नाही. बुधवारी (ता.३) पहाटेच्या सुमारास दोघे संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक केली. पोलिसांनी ५ लाख २५ हजारांच्या १२ दुचाकी, १ लाख ६५ हजारांची ५५ ग्रॅम सोन्याची लगड, २ लाख २३ हजारांच्या फ्रीज, संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असे एकूण ९ लाख १३ हजार ८०९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांची कसून चौकशी केली असता चोरीत एका विधीसंर्घर्षित बालकाचा समावेश असल्याचे सांगितले. तो धुळ्यात दुचाकी विकत असल्याचे तपास उघडकीस आले असून त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, तुषार चव्हाण, भास्कर मल्ले, मारुती गायकवाड, चंद्रकांत गवळी, अविनाश देवरे, धनंजय दोबाडे, मनोहर कोळी, हेमंत आहेर, दीपक वाणी, प्रमोद काशीद, नितीन फुलमाळी, संभाजी जाधव यांनी केली.

- Advertisement -

अटक केलेले चोरटे-

जमालुद्दीन उर्फ जमालु मोहम्मद अयुब चौधरी (२२, रा अंबड, मुळ उत्तरप्रदेश), मोहम्मद असराल मुश्ताक शहा उर्फ एम.डी (२१,रा. भारतनगर, वडाळारोड, मुळ उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यापूर्वीच चोरट्यांवर १४ गुन्हे

चोरट्यांनी अंबड, सातपूर, नाशिकरोड, उपनगर येथून दुचाकी व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे ५ गुन्हे, उपनगरमध्ये २ गुन्हे, नाशिकरोडमध्ये एक गुन्हा दाखल असून अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात एकूण सहा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पैसे संपले की घरफोडी, दुचाकीचोरी

घराबाहेर किंवा अपार्टमेंटमध्ये पार्क केलेल्या दुचाकी बनावट चावीने लंपास करायचे. संशयित एक आरोपी हमाली काम तर दुसरा ड्रायव्हिंगचे काम करायचा. पैसे संपले की दोघेजण घरफोडी व दुचाकीचोरी करायचे. घरफोडीत फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करायचे, असे तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -