घर उत्तर महाराष्ट्र अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली फोल; काही वेळातच पुन्हा थाटली दुकाने, नेमके अभय...

अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली फोल; काही वेळातच पुन्हा थाटली दुकाने, नेमके अभय कोणाचे?

Subscribe

नाशिक : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.१२) शालिमार ते मेनरोड या भागांतील अतिक्रमित फेरीवाल्यांना हटविण्यात आले. त्यानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. मात्र, या मोहिमेला दोन तास उलटत नाही तोच, अतिक्रमणधारकांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवत रस्त्याचा ताबा घेत मोहीमेची हवाच काढून घेतली.

अतिक्रमण निर्मूलन विभागाने आठवडाभरापासून मोहीम हाती घेतली आहे. त्यात नाशिकरोडसह पंचवटी व नाशिक पूर्व विभागांतील अतिक्रमणांविरुद्ध कारवाई हाती घेण्यात आली आहे. यासाठी सर्व विभागांना सोबत घेत संयुक्त मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान मेनरोडपासून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. ही मोहीम शालिमारपर्यंत पोहचण्यापूर्वीच पुरेसा वेळ मिळाल्याने अतिक्रमित फेरीवाल्यांनी फरार होत अरुंद गल्ल्यांमध्ये सुरक्षित जागेत आपल्या हातगाड्या उभ्या केल्या होत्या. अतिक्रमण निर्मूलन विभागाची मोहीम संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजेदरम्यान या अतिक्रमणधारकांनी पुन्हा एकदा रस्ता काबिज केला. त्यामुळे शालिमार ते मेनरोडच्या दिशेने जाणार्‍या वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला. ही समस्या सोडविण्यासाठी नियमित मोहिमेची गरज नागरिकांना व्यक्त केली.

कर्मचार्‍यांवर अधिकारी मेहेरबान
- Advertisement -

महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत १०-१० वर्षे लोटूनही बहुतांश कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी अत्यंत मुजोर बनले आहेत. आपली बदली कुणीही करू शकणार नाही, या त्यांच्या मानसिकतेला अधिकार्‍यांचेही पाठबळ लाभते आहे. नियमानुसार ३ वर्षांनी कर्मचार्‍यांच्या बदल्या होणे अपेक्षित असताना, वर्षांनुवर्षे त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणार्‍या मुख्यालयातील अधिकार्‍यांचीच आता चौकशी करण्याची वेळ आली आहे. या अधिकार्‍यांच्या प्रेमामुळेच कर्मचारी स्वतःला प्रशासन प्रमुख समजू लागले आहेत. त्यांचा हा भ्रमाचा भोपळा आता आयुक्तांनीच फोडण्याची गरज आहे. अन्यथा, कर्मचार्‍यांच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिकेची इभ्रत चव्हाट्यावर यायला वेळ लागणार नाही. सातपूर, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, नाशिक पूर्व आणि पश्चिम या सर्वच कार्यालयांत कर्मचारी तळ ठोकून आहेत. या कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना थेट विभागच बदलला पाहिजे, जेणेकरुन यांची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -