कर्तव्याचे सोहळे आता पुरे; गुन्हेगारी रोखायचाही प्रयत्न करा

पोलीस आयुक्तांची महिनापूर्ती; मात्र आजही गुन्हेगारांची भीती

साईप्रसाद पाटील । नाशिक

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून २० एप्रिलला जयंत नाईकनवरे यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली अन् नाशिककरांना ‘आता नाशिक गुन्हेगारीमुक्त होईल’ अशी अपेक्षा लागली. त्याचे कारणही तसेच होते. मुंबई-पुण्यासारख्या बड्या शहरांत गुन्हे शाखेचे वरिष्ठ म्हणून कामाचा तगडा अनुभव, तसेच नार्कोटिक्स शाखेचाही अनुभव पाहता नाशकातील गुन्हेगारांवर नाईकनवरे यांची दहशत पसरण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास होता. मात्र, गेल्या महिनाभराच्या कालावधीत केवळ ओळख परेड, नागरिकांशी संवाद, शुभेच्छा भेटी तथा माहिती घेण्यात व्यस्त राहिलेल्या आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून गुन्हेगारीचा बिमोड करणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी सहकार्‍यांसमवेत ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येणे का टाळले असावे, असा सवाल आता महिनापूर्तीनंतर नाशिककरांकडून विचारला जातोय.

धार्मिक वलय लाभलेल्या अन् प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या शांतताप्रिय नाशिकमध्ये अलिकडे रक्तपात, गुन्हेगारीमुळे कुणीही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने होत असलेल्या खून, लूटमार, अत्याचार, हाणामारीच्या घटनांमुळे नाशिक शहर प्रचंड तणावात असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांचाच विचार केला, तर नाशकात चार खूनाच्या घटना घडल्या. यात आत्महत्या, हाणामारी, लुटमारीच्या घटना वेगळ्याच. अशा स्थितीत केवळ संबंधित गुन्ह्यांतील गुन्हेगार वा संशयित ताब्यात घेण्यापलिकडे कारवाई होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने आता तरी पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये येऊन गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पावले उचलतील का, असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जात आहे.

दहशत गेली कुठे ?

नाशकात यापूर्वी काही अधिकारी असे होऊन गेले, ज्यांनी थेट रस्त्यावर उतरून गुन्हेगारांची धिंड काढली. मग ते आयुक्त असो वा उपायुक्त. गुन्हेगारांना भररस्त्यात पोलिसी खाक्या दाखवून लाठीचा प्रसाद दिला गेल्याने त्यांच्या मनात पोलिसांची दहशत निर्माण झाली होती. शिवाय, मोठ-मोठ्या टोळ्यांचे म्होरके शोधून त्यांची रवानगी तुरुंगात केली गेल्याने अनेकदा गुन्हेगारीचा बिमोड करण्यात यश आले होते. तसेच टोळी युद्धांवरही अंकूश राहिला. मात्र, या कारवाई सातत्य न राहिल्याने वारंवार गुन्हेगारीने डोके वर काढले अन् नाशिककरांची सुरक्षा धोक्यात आली.

रात्रीची गस्त नावालाच

नाशकात द्वारका, बिटको पॉइंट, नाशिकरोड, चोपडा लॉन्स, सीबीएस, मुंबई नाका, पाथर्डी फाटा, सातपूर, आनंदवली, पेठ फाटा, पंचवटी, आडगाव, नांदूर नाका, उपनगर ही अशी काही ठिकाणे रात्रीच नव्हे, तर दिवसाही वाटसरू, प्रवाशांना धोक्याची बनली आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस नावापुरतीच पोलीस गस्त वा बारकोड स्कॅनिंग होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळनंतर महिला वा युवतीच नव्हे, तर पुरुषही सुरक्षित नसल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसून येते. रात्रीच्या वेळेत गुन्हेगारी पार्श्वभूमी अन् विनानोंदणी रिक्षाचालकांचा वाढता वावर धोकादायक ठरतोय. रात्री प्रवासी वा एकटी व्यक्ती दिसल्यास तिला सावज बनवले जाते. पोलिसांचा धाकच नसल्याचे दिसून येते.

गुन्हेगार सुधारणेचा विसर

केवळ गुन्हेगारी न संपवता, आरोपींमधला गुन्हेगार संपवण्याच्या उद्देशातून तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुन्हेगार सुधार मोहिमेअंतर्गत मेळावे घेऊन गुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का कायद्याचा वापर करून मोठ-मोठ्या गुन्ह्यांतील आरेापींना मोक्काअन्वये थेट तुरुंगात डांबले. तसेच अनेक गुन्ह्यांतील आरोपींना तडीपार केले, गँगस्टर्सच्याही मुसक्या आवळल्याने आपसूकच गुन्हेगारीवर काहीसा अंकूश बसला. मुख्य म्हणजे, गुन्हेगारीचे मूळ उगमस्थान असलेले अवैध धंदे रोखण्यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचे सिद्ध करून आयुक्त पाण्डेय यांनी कारवाईचे अस्त्र उगारल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. मात्र, नूतन पोलीस आयुक्तांकडून अशा प्रकारची वा त्याहून वेगळी कारवाई कधी केली जाईल, याची वाट नाशिककरांना पाहावी लागत आहे.

संवादातून साध्य काय..?

रूजू होताच नाशिककरांना ४ ते ६ या वेळेत सुसंवाद साधण्याची संधी पोलीस आयुक्तांनी उपलब्ध करून दिली. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्याचे उच्चाटन करणे सोप्पे होईल, हा मूळ हेतू सांगितला गेला. परंतु, हा सुसंवाद केवळ संवाद तर नाही ना झाला आणि कुणीही या शुभेच्छा द्या, गप्पा करा.. फोटो काढा असेच प्रकार तर नाही झाले ना, अशी चर्चाही आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे किमान आता महिन्यापूर्तीनंतर तरी आयुक्त थेट कारवाईच्या मूडमध्ये येतील, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.