जातीयवाचक गल्ल्यांना आता मिळणार नवीन नावे

समाजकल्याण विभागाच्या आदेशानंतर महापालिकेचा निर्णय

नाशिक : शहरातील तब्बल ८० वस्त्या, गल्ल्यांची जातीयवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने काढलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील २६ गावांची नावे सप्टेंबर महिन्यात बदलण्यात आली आहे.

पेशवेकाळापासून नाशिकमधील वाड्यांची पारंपरिक नावांप्रमाणे ओळख आहे. आजही शहरातील काही भागांची ओळख ही एका विशिष्ट जातीच्या नावावरून परिचित आहे. परंतु वर्षानुवर्षापासूनची ही ओळख आता पुसली जाणार असून जातीयवाचक नावे असलेली वाडे, गल्ल्यांची नावे बदलण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर केला होता. त्यास मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार आता समाजकल्याण विभागाच्या आदेशानंतर महापालिका क्षेत्रातील ८० ठिकाणांची वस्त्या, गल्ल्यांची जातीयवाचक नावे बदलणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

शहरातील या भागांना मिळणार नवे नाव

कोळी वाडा, कुंभार वाडा, तेली गल्ली, मातंग वाडा, पिंजार घाट, सुतार गल्ली, तांबट लेन, गोसावी वाडी, कोकणीपुरा, कन्सारा लेन, इस्लामपुरा, वंजारवाडी, बोहरपट्टी, सिंधी कॉलनी, लिंगायत कॉलनी, ख्रिश्चन वाडी आदी ८० ठिकाणांची नावे बदलणार आहे.

२६ गावांची नावे बदलली

नाशिक जिल्ह्यातील 26 गावांची नावे सप्टेंबर महिन्यात बदलण्यात आली. यात चांदवड तालुक्यातील 9, त्र्यंबक 2, निफाड 4, दिंडोरी 4, सटाणा ४, पेठ तालुक्यातील 3 गावांचा समावेश आहे. नाव बदलण्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नाव बदलण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवला जातो. यानंतर गावाचे नाव बदलण्यात येते.

समाजकल्याण विभागाने जातिवाचक नावे बदलावीत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहरातील 80 ठिकाणांची जातिवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. त्यांना दुसरी नावे दिली जातील.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका