घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रऐन पावसाळ्यात संगमनेरच्या पठारभागातील गावे तहानलेलीच

ऐन पावसाळ्यात संगमनेरच्या पठारभागातील गावे तहानलेलीच

Subscribe

तालुक्यातील १५ गावांसह २७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

संगमनेर : राज्यात सर्वत्र पाऊस सुरु असला तरी संगमनेर तालुक्यातील पठारभागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पठारभागातील पाण्याचे उदभव अजूनही कोरडेठाक आहेत. परिणामी, ऐन पावसाळ्यात १५ गावांसह २७ वाड्यांना ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पठारभागात दररोप पाण्याच्या टँकरच्या 35 फेर्‍या होत आहेत, अशी माहिती संगमनेर तालुका गटविकास अधिकारी अनिल नागणे व टंचाई कक्षप्रमुख संजय अरगडे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यचा पठारभाग म्हटले की नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते. याचा प्रत्यय आता पावसाळ्यातही येवू लागला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. मात्र, पठारभागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. केवळ संततधार सुरू असल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळत आहे. परंतु, पाण्याचे उदभव अजूनही कोरडेठाक असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पठारभागातील गावांसह वाड्या-वस्त्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसतात. मात्र, आता पावसाळ्यातही झळा बसत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. पठारभागातील पोखरी बाळेश्वर, सावरगाव घुले, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, दरेवाडी, पिंपळगाव देपा, डोळासणे यांसह पानोडी, खरशिंदे, खांबे, सायखिंडी आदी गावांसह 27 वाड्यांना पाणी टंचाई भासत असल्याने 20 हजार 43 लोकसंख्येला ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

पठारभागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना या पावसाचा चांगलाच फायदा होत आहे. मात्र, अद्यापपावेतो दमदार पाऊस झाला नसल्याने पठारभागातील ओढे, नाले, सिमेंट बंधारे, पाझर तलाव यांना म्हणावा तसे पाणी आलेले नाही. त्यामुळे पठारभागातील बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -