नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हयासह संपूर्ण राज्यात पावसाची मोठी प्रतिक्षा आहे. अनेक भागात पेरणी झालेली नाही तर जिथे पेरणी झाली तिथे दुबार पेरणीचे संकट आहे. काही भागात तर तिसर्यांदा पेरणी होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा हवामान विभागाकडे आणि पावसाकडे लागल्या आहेत. गुरूवारी सकाळपासून नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
सेवानिवृत्त हवामानशास्त्र विभागाचे तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक जिल्हयातील ९२ पैकी ५५ महसुली मंडळांमध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. पेरणी केलेली पिके करपू लागली आहे. धरण प्रकल्पांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा असला तरी, तो पुरेसा नाही. हा पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आल्याने शेतीपिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता सगळी भिस्त पावसावरच अवलंबून आहे.
आताच्या पावसाने शेती पिकांना जरी तितकासा फायदा होणार नसला तरी, पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडयातही कमालीची वाढ झाली आहे. गुरूवारी सकाळापासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी साडेचार वाजेनंतर जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांसह हॉकर्स चालकांची तारांबळ उडाली. सायंकाळच्यावेळी घराकडे परतणार्या चाकरमान्यांचीही यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. शहरात कृष्णजन्माष्टमीनिमित्त विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या सरी अंगावर झेलत गोविंदांनही दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
हेही वाचा : आशादायी खुशखबर! गुरुवारपासून नाशिकसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज