शिवसेनेच्या आयत्या पीठावर रेघोट्या ओढणं थांबवा

माजी आमदार योगेश घोलप यांचा आमदार सरोज आहिरेंना इशारा

नाशिकरोड – आमच्या काळात मंजूर झालेल्या कामांची उद्घाटनं आमच्याच नाकावर टिच्चून केली जाताहेत. हे आता आम्ही आता खपवून घेणार नाही, निदान आतातरी आयत्या पीठावर रेघोट्या ओढणं थांबवावं. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा थेट इशारा शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी आमदार सरोज आहिरे यांना दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झालेली असली तरी पहिल्या दिवसापासून देवळाली मतदार संघात शिवसेना-राष्ट्रवादीत विळ्या-भोपळ्याचं नातं आहे, दिवसेंदिवस हा वाद विकोपाला जात असून, आता पुन्हा एकदा विकासकामांच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला आहे. शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी गुरुवारी (दि.७) पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहिरेंनी केलेल्या उद्घाटन कार्यक्रमांवरुन अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, देवळाली मतदार संघात दोन वर्षापासून कामांच्या उद्घाटनांची बनवेगिरी सुरू आहे. मी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत केले. आमच्या कार्यकाळात मंजूर कामांची उद्घाटनं करुन श्रेय घेणं, ही शोकांतिका आहे.

देवळाली कॅन्टोंन्मेंटला ५ कोटीचा निधी २०१८ साली मंजूर झालेला आहे. राज्यातील देहू, खडकी, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली, कामठी (नागपूर) अशा सात कॅन्टोंन्मेंट बोर्डांना निधी उपलब्ध करुन देण्याला कॅबिनेटने मंजूरी दिलेली असताना सार्वजनिक कार्यक्रमातून पाठपुरावा केल्याचं सांगत आमदार अहिरे मतदारांची दिशाभूल करत आहेत. त्यांचा हा खोटारडेपणा जनतेसमोर येणे गरजेचे होते. यापुढे असे झाले तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.