पेशवेकालीन रहाडींच्या खोदकामाला सुरुवात; रंगपंचमीसाठी नाशिकर सज्ज

नाशिक : होळीच्या पाचव्या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात रहाडीत रंगोत्सव खेळण्याची परंपरा आहे. आगामी रविवारी (दि. १२) या रंगोत्सवात अवघे शहर न्हाऊन निघणार आहे. त्यासाठी प्रमुख रहाडींच्या खोदकामाला सुरुवातही झाली आहे. नाशिकमधील 300 वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. रहाडीमधील रंगाच्या पाण्यात आंघोळ केल्यामुळे त्वचारोग होत नाही. तसेच, उन्हाचा त्रास होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो जणांची झुंबड उडते.

शहरातील जुने नाशिक गावठाणात पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी अर्थात भूमिगत हौद आहेत. या रहाडींवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या निमित्ताने गेल्या रंगपंचमीपासून बंद असलेल्या या रहाडी आता खुल्या केल्या जात आहेत. त्यांची साफसफाई व डागडुजीचे काम सुरू आहे. या रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाते. विधीवत पूजन करून नवैद्य दाखवला जातो. त्यानंतर रंग खेळण्यास सुरूवात होते.

शहरात सात रहाडी आहेत. त्यापैकी दोन रहाड या बंद असून, पाच रहाडी खुल्या केल्या जातात. जुन्या नाशिकमधील शिवाजी चौकात साती आसरा मंदिरासमोर एका पेशवेकालीन रहाडीचा शोध लागला आहे. गेल्यावर्षी ही रहाड रंगोत्सवासाठी खुली करण्यात येणार होती. मात्र, दुरुरुस्तीच्या कामामुळे ती उघडता आली नाही. तसेच, दंडे हनुमान मित्र मंडळाची रहाडदेखील बंद ठेवण्यात आली होती.

प्रत्येक रहाडीचा रंग असतो वेगळा

रहाडीतील रंगोत्सवासाठी रंग वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्यासाठी पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवतात. तिवंधा चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 10 फूट रूंद आहे. या रहाडीचा रंग केशरी असून, याच्या पूजेचा मान मधली होळी तालीम संघाकडे आहे. शनी चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 12 फूट रूंद आहे. या रहाडीचा रंग गुलाबी असून, पूजेचा मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या रहाडीचा रंग पिवळा असून, या रहाडीच्या पूजेचा मान सोमनाथ वासुदेव बेळे यांच्याकडे आहे. रंगोत्सव संपल्यानंतर बल्यांचा (सागवानी लाकडांचे मोठे ओंडके) वापर करून ही रहाड बुजवली जाते. या रहाडीत रंगाचे पाणी असते. त्यावर ऊसाचे चिपाड आणि माती टाकली जाते. ही रहाड थेट पुढच्या रंगपंचमीसाठीच खुली केली जाते.

धप्पा मारण्याची पद्धत

या रहाडीभोवती तरुण गोल उभे राहतात. रहाडीतल्या पाण्यात तरुण जोरदार सूर मारतात. याला धप्पा मारणे असे मजेदार नाव आहे. धप्पा मारल्यावर किमान २० ते २५ माणसाच्या अंगावर रंगाचे पाणी उडाले तर तो खरा धप्पा समजला जातो. ज्या माणसाच्या अंगावर रंग नाही त्याने या वर्षी रहाडीत धप्पा मारला नाही, असे समजले जाते. यावेळी रहाडीमध्ये उडी मारण्यासाठी तरुणांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगते.