विदेशी दारु ट्रक लुटीचा बनाव चालकाच्या अंगलट

दोघांना अटक; ट्रकसह ८२ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

mahavikas aghadi government cabinet decision permission to sell wine in super market said nawab malik
Wine : किरणा दुकान अन् सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

विदेशी मद्याचे १ हजार २५४ बॉक्स कंपनी मालकाने म्हाळुंगी शिवार (ता. दिंडोरी) येथून अकोला जिल्ह्यात पोहचण्यासाठी ट्रकचालकास विश्वासाने हवाली दिले होते. मात्र, ट्रकचालकाने साथीदारासह लुटीचा बनाव करत विदेशी मद्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करत ट्रकचालकासह एका साथीदाराला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जऊळके दिंडोरी परिसरातील आशापुरा वेअर हाऊसमध्ये लपवून ठेवलेले १ हजार २४९ विदेशी मद्याचे बॉक्स, ट्रक, दुचाकी असा एकूण ९२ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पवारवाडी, मालेगाव येथील इजाज खान समद खान, नानावली, नाशिक येथील साथीदार अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेख सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाडीवर्‍हे व वणी पोलीस ठाण्यात अपहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

१७ डिसेंबर रोजी कादवा म्हाळुंगी शिवार (ता. दिंडोरी) येथील परनॉड रिकॉर्ड कंपनीतून परवाना असलेले विदेशी मद्याचे १ हजार २५४ बॉक्स अकोला जिल्हा येथून जाण्यासाठी धर्मेंद्र मंडलोई यांनी ओळखीचे ट्रान्सपोर्ट कंपनी गणेश रोडलाईनकडील १२ टायर मालवाहू ट्रकचालक इजाज खान याचे हवाली करुन रवाना केले होते. इजाज खान याने ८२ लाखांचे विदेशी मद्य व ट्रक (एमएच १५-डी. के. ४९५५) अकोला येथे न पोहचविता परस्पर विल्हेवाट लावून अपहार केला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
ट्रकचालक खान माल घेवून अकोला येथे जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गाने मालेगावमार्गे रवाना झाला होता. खान १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री मालेगावातील स्टार हॉटेल येथे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरु केला. तपासात खान व त्याच्या साथीदाराने विदेशी मद्याचा परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी खान व शेख यांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. विदेशी मद्य अकोला येथे न पोहचवता विल्हेवाट लावल्याचे त्यांनी सांगितले. शेख याने मद्यसाठा जऊळके दिंडोरी परिसरातील एका गोडाऊनमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करत मद्यसाठा जप्त केला.