पंचवटी परिसरात वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांसह भाविक हैराण झाले असतानाच नाशिकच्या माजी महापौरांच्या घरासमोरून त्यांच्या जावयाची आलिशान कार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये वाहनचोरीचे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांसह थेट माजी महापौरांच्या जावयाची कार लंपास केल्याने पोलिसांच्या रात्र गस्ती आणि गुन्हे शोध पथकाचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांनी थेट राजकीय नेत्यांसह पोलिसांना एकप्रकारे खुले आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Expensive car stolen from outside former mayor’s house)
पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे जावई प्रवीण चंद्रकांत वाटमारे, (वय३३, रा. बार्शी टाकळी, जि. अकोला) हे शनिवारी (दि.१) सासरे अशोक देवराम मुर्तडक यांच्या मुर्तडक चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी येथे आले होते. रात्रीच्यावेळी त्यांची फॉर्च्युनर कार (एम. एच. ३० बी. बी. १७७) चोरट्यांनी लंपास केली आहे. ही बाब रविवारी (दि. २) सकाळी लक्षात येताच मुर्तडक आणि वाटमारे यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत अज्ञात आरोपींविरोधात वाहन चोरीची फिर्याद दाखल केली.
शासनाकडून नुकतेच पोलिसांना गस्त घालण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, वाहनचोरीच्या घटनांमुळे रात्रीची गस्त फक्त कागदावरच असल्याचे दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, गुन्हे शोध पथक हे शोभेचे बाहुले बनून राहिले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात होणार्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येत आहे.