द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा!

नेदरलँड,बेल्जियममध्ये ८९ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

राकेश बोरा | लासलगाव : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. नेदरलँड आणि बेल्जियम या देशामध्ये सात कंटेनरमधून ८९ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणार्‍या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा ७ जानेवारी सुरुवात झाली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे. ९० रुपये प्रतिकिलोपासून ते १०५ रुपये किलो दर निर्यातक्षम द्राक्षला मिळत आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन २०२०-२१ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार १०७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २२९८ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले.त्यामुळे केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल या कडे लक्ष देने आवश्यक आहे.

गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. आता तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर भारत उभा असल्याने पुन्हा द्राक्ष उत्पादकाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

या देशात होते निर्यात

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारी पासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया बांगलादेश आदी देशांत पाठविण्यात येतात.

४३ हजार बागांची झाली नोंद

महाराष्ट्रातून यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ४३ हजार ५३ द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. भारतीय शेतमाल आणि फळबागेला बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्युटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल.

प्रतिक्रिया 

कंटेनरचे वाढलेले भाडे,पॅकिंग मटेरियल, इंधन दरवाढ यामुळे निर्यात खर्चात वाढ झाली आहे. याचा विचार करत केंद्र सरकारने माल वाहतूक भाड्यात पन्नास टक्के अनुदान देऊन दिलासा द्यावा.
– कैलास भोसले,उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

निर्यात वाढवण्यासाठी काय अपेक्षित?

  1. आंतरराष्ट्रीय पातळीवर चिली, दक्षिण आफ्रिका, पेरु, इजिप्त या देशातून युरोपीय देशात निर्यात होणार्‍या द्राक्षमालास कोणतेही आयात शुल्क नाही. मात्र, भारतातून निर्यात केल्या जाणार्‍या द्राक्षमालास आठ टक्के आयात शुल्क द्यावे लागते. ते रद्द करुन इतर देशाप्रमाणे विनाशुल्क करावे.
  2. देशातील द्राक्षमाल थेट बांगलादेशात किसान रेलद्वारे पोहचविण्यात यावा. ट्रक कंटेनरद्वारे जाणार्‍या द्राक्षमालामुळे सीमेवरील होणारा जादा खर्च वाचेल.या करिता निफाड रेल्वे स्थानकावर किसान रेल्वे उपलब्ध करून द्यावी.
  3. द्राक्ष शेती सतत तीन वर्षांपासून संकटात आहे. अतिवृष्टी, कोरोना संकटाने फटके खात आहे. या घटकांमुळे द्राक्षशेती मोठ्या अडचणीत आहे. द्राक्षबागांचे अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र, त्याची तुटपुंजी भरपाई दिली जाते. याकरिता शासनाने क्रॉप कव्हर व व्हरायटी बदलासाठी अनुदानाची योजना आणावी. तरच नैसर्गिक संकटापासुन द्राक्षशेती वाचू शकेल.

द्राक्ष निर्यात आलेख

  • २०१७-१८ -१८८२२१ मॅट्रिक टन- १९०० करोड
  • २०१८-१९ -२४६१३३ मॅट्रिक टन- २३३५ करोड
  • २०१९-२० -१९३६९० मॅट्रिक टन- २१७७ करोड
  • २०२०-२१ – २४६१०७ मॅट्रिक टन- २२९८ करोड