घरताज्या घडामोडीबनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

Subscribe

करोना प्रतिबंधासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा मोठी मागणी असतानाच, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने शुक्रवारी (दि.१३) गोळे कॉलनीतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकून, दोन किरकोळ विक्रेत्यांकडून एक लाख सहा हजार २१० रुपयांचा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे हा साठा विनापरवाना उत्पादित केल्याचेही आढळून आले.

रिटेल व होलसेल विक्रेत्यांनी मास्क व सॅनिटायझरचा साठा करु नये, असे प्रशासनाने आदेश दिले असतानाही मोठ्या प्रमाणावर साठेबाजी सुरू असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने दिसून आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अन्न व औषध प्रशासनाने भरारी पथक गठीत केले आहेत. या पथकात औषध निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, महापालिका, निरीक्षक वैद्यमापकशास्त्र यांच्या प्रत्येकी एक प्रतिनिधीचा समावेश आहे. या भरारी पथकाने बुधवारी (दि.१३) गोळे कॉलनीतील रिटेल विक्रेते व होलसेल विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या. त्यात राहुल एन्टरप्राईजेस व आशापुरी एजन्सी या दोन किरकोळ विक्रेत्यांकडे एक लाख सहा हजार २१० रुपये किंमतीचा बनावट सॅनिटायझरचा साठा आढळून आला. औषध निरीक्षक सु. सा. देशमुख यांनी हा साठा जप्त केला. याप्रकरणी पुढील चौकशी केली जात असून, संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. करोना प्रतिबंधासाठी रिटेल व होलसेल विक्रेत्यांनी एन-९५ मास्क, इतर मास्क, हॅण्ड सॅनिटायझरचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्याबाबत व तुटवडा भासणार नाही, एन ९५ मास्कची विक्री विनाचिठ्ठी करू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांनीही सभासदांना या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील करोनासदृश्य ८१ जण देखरेखेखाली

महाराष्ट्रात २२ करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात परदेशातून आलेले ८१ जणांवर आरोग्य यंत्रणेनुसार नियमित १४ दिवस तपासणी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या २१ पैकी १७ करोनासदृश्य रुग्णाचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. शुक्रवारी (दि.१३) दुबईहून आलेले दोन जण आणि शनिवारी (दि.१४) बांग्लादेश व दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. चौघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने रुग्णालयाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -