Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र उद्धट ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे दूर; वेळकाढूपणातच पालिका व्यस्त

उद्धट ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे दूर; वेळकाढूपणातच पालिका व्यस्त

Subscribe

नाशिक : महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍याशी अरेरावीच्या भाषेत बोलणार्‍या चेतन बोरा या ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिली खरी; प्रत्यक्षात या ठेकेदाराची भाषा पाहता वेळकाढू भूमिका घेण्यापेक्षा प्रशासनाने कर्मचारी आणि नाशिककरांची काळजी वाहत स्वत:हून गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. परंतु, बोरांच्या ‘माये’ने समाधानी असलेल्या प्रशासनाला ना कर्मचार्‍यांची काळजी ना, नागरिकांची हेच यातून स्पष्ट होते.

महापालिकेकडून पूर्व आणि पश्चिम विभागातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मे. वॉटरग्रेस कंपनीला काम दिले आहे. नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या या वॉटर ग्रेस कंपनीला स्थायी समितीने यापूर्वी ब्लॅक लिस्ट केले होते. कर्मचार्‍यांना पुरेसा पगार न देणे, त्यांना बोनस न देणे, घंटागाडी नियमितपणे न फिरवणे यांसह असंख्य तक्रारी या ठेकेदाराच्या बाबतीत आहेत. परंतु, तरीही प्रशासन या ठेकेदारावर इतकी ‘माया’ लावते की, त्यालाच वारंवार कचरा संकलनाचा कोट्यवधींचा ठेका दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा ठेका मिळत असल्याने ठेकेदाराचा उद्धटपणा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार एका स्वच्छता निरीक्षकाने ठेकेदार बोरा यांच्याकडे केली. मात्र, या तक्रारीचे निराकरण न झाल्याने संबंधित स्वच्छता निरीक्षकाने महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही बाब टाकली. त्याचा राग आल्याने बोरा यांनी अर्वाच्य शब्दात स्वच्छता निरीक्षकाला सुनावले.

- Advertisement -

या दोघांच्या संभाषणाचे रेकॉर्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात बोरा यांनी स्वच्छता निरीक्षकाला, ‘नागरिकांचा जीव जाईल तर ते नागरिक पाहतील. तू कशाला मध्ये पडतो’ असे सुनावले. महापालिकेच्या कर्मचार्‍याला एक ठेकेदार अशा पद्धतीने बोलतो, शिवाय नागरिकांच्या जीवाचीही पर्वा त्याला नसल्याचे त्याच्या संभाषणावरुन लक्षात येते, अशावेळी महापालिका प्रशासनाने स्वत:हून पुढाकार घेत बोरा यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासन वेळकाढूपणा करण्यातच धन्यता मानत आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘माय महानगर’ने प्रसिद्ध केल्यानंतर विभागीय आयुक्त तथा प्रभारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने पालिका अधिकार्‍यांना संपर्क साधत बोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभारी अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी बोरासह स्वच्छता निरीक्षकांकडून लेखी खुलासा मागवला आहे. बोरा यांनी ‘माय महानगर’शी बोलताना हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगत, माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता. मात्र, त्यातून सदर कर्मचारी दुखावला गेला असेल तर त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी माफी मागितली आहे. तसे लेखी पत्रही प्रशासनाला दिले असल्याचे बोरा यांनी सांगितले.

कर्मचार्‍यावर दबाव; प्रशासन का घाबरते?

- Advertisement -

संबंधित कर्मचार्‍यावर आता सर्वच स्तरांवरुन दबाव येत असल्याने तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो की नाही याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनानेच पुढाकार घेऊन बोरा यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासन मात्र वेळकाढू भूमिका घेत असून त्यामाध्यमातून बोरांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येते.

स्वच्छता कर्मचारी व ठेकेदार यांच्यातील व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी खालील लिंक उघडा 
https://fb.watch/kLipCUPbNu/

 

- Advertisment -