कृषी कायद्याविरोधात नाशिकहून शेतकरी दिल्लीकडे

नाशिक । शेतकरी विरोधी कृषी कायदे रद करावेत या प्रमुख मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून किसान संघर्ष यात्रेव्दारे शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शनिवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमत शेतकर्‍यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्योजक, भांडवलदारशाही विरोधात घोषणाबाजी केली. हे शेतकरी नागपूर येथे जाणार असून नागपुरहून राज्यभरातून आलेल्या शेतकर्‍यांचा जथ्था दिल्लीकडे कूच करणार आहे.

२३ डिसेंबरपासून दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलकांना बदनाम करत असल्याचा आरोप यावेळी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केला. या देशातील कोणत्याही शेतकर्‍याने किंवा शेतकरी संघटनांनी या कायद्याची मागणी केलेली नाही. तरी हे कायदे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आले. या कायद्याने शेतीमालाचा संपुर्ण व्यापार कार्पोरेट कंपन्यांच्या हाती जाणार आहे. या कायद्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे. शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या विजेवरील अनुदान रदद करून व दराचे वेगवेगळे टप्पे रद करून सर्व ग्राहकांना एकसमान पध्दतीने विज आकारणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे जोपर्यंत हे कायदे रदद केले जात नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या शेतकरी जथ्थात राजु देसले ,प्रकाश रेड्डी , किसान सभा जिल्हा अध्यक्ष भास्कर शिंदे , सरचिटणीस देविदास भोपळे , जिल्हा संघटक विजय दराडे , सुकदेव केदारे , अँड.दत्तात्रय गांगुर्डे , नामदेव बोराडे, मधुकर मुठाळ , प्रा. के एन अहिरे, जगन माळी, विठोबा घुले,यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

नाशिकवरुन पुढे पिंपळगाव बं. , चांदवड येथे या शेतकरी जथ्थेचे स्वागत होणार आहे. तसेच धुळे येथे सभा होऊन रात्री अमरावती मोजरी येथे मुक्काम करून सकाळी हा जथ्था नागपूर येथे 3 जानेवारी ला 2 वाजता. पोहचेल तिथे अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची जाहीर सभा होईल असे देसले यांनी सांगितले.