बाजार समितीच्या राजकारणात शेतकर्‍यांचे नुकसान

कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांना गाळेधारक, शेतकर्‍यांचे निवेदन

स्वप्निल येवले । पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकांच्या आदेशानुसार पेठ रोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीतील १७८ गाळे धारक यांना बाजार समिती सचिवांनी अतिक्रमण प्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. खरतर हे प्रकरण पालिका आणि बाजार समिती यांच्यात असताना आता यात शेतकरी भरडला जाणार असल्याचे दिसत आहे.
बाजार समितीकडून गाळेधारकांनी बांधलेले शेड २५ जुलै पर्यंत स्वतःहून काढून घेण्याचे सांगितले जर २५ जुलै नंतर शेड तश्याच दिसल्या तर त्यानंतर बाजार समितीकडून त्या काढण्यात येईल आणि होणार्‍या नुकसानीस गाळेधारक जबाबदार राहतील असे म्हंटलेले आहे.

जवळपास हे शेड ६ वर्ष जुने असून तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात हे अतिक्रमण उभारले गेले असून बाजार समितीने रीतसर त्या गाळे धारकांकडून शुल्क आकारले आहे. जर बाजार समितीला हे अनधिकृत बांधकाम आहे हे माहित असताना ही त्यांनी इतके वर्ष यांच्याकडून पैसे घेत अतिक्रमणाकडे डोळे झाक का केली हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या अनेक खाजगी बाजार समित्या शहरालगत तयार झालेल्या असून शेतकरी त्यांच्याकडे न वळता अजूनही या बाजार समितीकडे आपला माल विक्रीसाठी आणत आहे. कारण शेतकर्‍यांना बाजार समितीत सुरक्षित वाटते आणि फसवणूक होणार नाही याची खात्री आहे. शेतकर्‍यांची बाजार समितीकडून एकच अपेक्षा आहे की सध्या करण्यात येणारी कारवाई थांबवावी कारण काही दिवसात टोमॅटो विक्रीसाठी बाजारात आणला जाणार आहे आणि जर बाजार समितीत खरेदीसाठी आडतेच राहणार नसतील तर मग आम्ही पिकवलेला माल विकायचा कुठे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. कारण टोमॅटो हा नाशवंत असून तो जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही तर आडत्यांना आलेला माल निवडण्यासाठी आणि पॅकिंग साठी बंदिस्त जागा लागत असते जर शेड काढले तर मग व्यापारी आणि आडते बसतील कुठे हा प्रश्न निर्माण होतो. बाजार समितीतील राजकारणाच्या खेळात शेतकरी वर्ग भरडला जात असून प्रशासकाच्या कार्यकाळात नवीन सुधारणा मिळतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

शेतकर्‍यांचे होवू शकते नुकसान

नोटिसांमध्ये सर्वाधिक टोमॅटोची खरेदी करणारे व्यापारी आहेत. खरिप हंगामातील टोमॅटोच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार या बाजारात येत्या काही दिवसात जोरात सुरु होणार असल्याने ती खरेदी कशी करायची? हा प्रश्न या व्यापार्‍यांना पडला आहे. या मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

गाळेधारक, शेतकर्‍यांनी घेतली आमदारांची भेट

नाशिक बाजार समितीतील १७८ गाळेधारकांना नोटिसा मिळालेल्या आडते व व्यापारी यांनी पूर्व विधानसभा आमदार राहूल ढिकले यांची भेट घेतली. शेतकरी व व्यापारी यांचे होणारे नुकसान टाळणे बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करत या संकटातून बाहेर काढण्यास सहकार्य करावे अशी विनंती केली.

शेतकरी हा पहिलेच आसमानी संकट नेहमीच घेरलेला असतो.त्यावर मात करीत शेतमाल उत्पादन करीत असतो.यातच टोमॅटो मार्केट बंद पडतील काय अशी माहिती पाणी पडली आहे यामुळे आम्ही चिंताग्रस्त झाला असून बाजार समितीने यावर योग्य तो निर्णय घेऊन टोमॅटो मार्केट चालू ठेवावे. :दीपक खताळे, शेतकरी, सिन्नर

पुढील महिन्यापासून टोमॅटो उत्पादक शेतकरी मार घेऊन येण्यास सुरुवात होते यातच टोमॅटो व्यापारी गाळेधारकांचा प्रश्न उपस्थित झाला आहे तरी याप्रकरणी प्रशासक व सचिव यांनी योग्य तो मार्ग काढत शेतकर्‍यांचे तसेच यातील दुवा व्यापारी गाळेधारक यांना न्याय मिळवून द्यावा. : बाळू महाले, व्यापारी